कार खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात का? मग आधी ही बातमी वाचा आणि मगच कोणती कार घ्यायची, हे ठरवा. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्याने वाढत असताना हायब्रीड कार हा एक उत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे. या गाड्या इंधनाची बचत तर करतातच, शिवाय पर्यावरणपूरकही आहेत. पण खरंच हा परवडणारा सौदा आहे का? त्याचे गणित समजून घेऊया.
हायब्रीड कारमध्ये पारंपरिक पेट्रोल इंजिन तसेच इलेक्ट्रिक मोटर असते. या कारमध्ये कधी पेट्रोल इंजिन, कधी इलेक्ट्रिक मोटर तर कधी दोन्हीचा वापर केला जातो. यामुळे इंधनाचा वापर कमी आणि मायलेज चांगले मिळते.
पारंपरिक पेट्रोल/डिझेल कारपेक्षा हायब्रीड कार 20-30 टक्के महाग असतात. उदाहरणार्थ, जर पेट्रोल कारची किंमत 10 लाख रुपये असेल तर त्याचे हायब्रीड व्हर्जन 12-13 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र, हायब्रीड कार जास्त मायलेज देतात.
पेट्रोल कारचे सरासरी मायलेज: 16-18 किमी प्रति लीटर
हायब्रीड कारचे सरासरी मायलेज : 22-25 किमी/लीटर
तुम्ही दिवसाला 50 किमी गाडी चालवत असाल तर पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लिटर गृहीत धरून हायब्रीड कार महिन्याला 3000 ते 5000 रुपयांपर्यंत बचत करू शकते.
हायब्रीड कारचे इंजिन कमी काम करते. यामुळे त्याचे आयुर्मान वाढते. बॅटरी रिप्लेसमेंटचा खर्च जास्त (दीड ते दोन लाख रुपये) असला तरी तो 8-10 वर्ष टिकू शकतो.
काही सरकारे हायब्रीड कारवर कर सवलत आणि सबसिडी देतात. यामुळे त्यांची सुरुवातीची किंमत कमी होऊ शकते. या गाड्या पर्यावरणपूरक असल्याने सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे.
जर तुमचा रोजचा प्रवास लांबचा असेल तर ही कार खूप फायदेशीर ठरेल. इंधनाचे दर टाळायचे असतील तर हायब्रीड कार हा चांगला पर्याय आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातूनही हा शहाणपणाचा निर्णय ठरेल. जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि ड्रायव्हिंग कमी असेल तर पारंपरिक कार हा स्वस्त पर्याय ठरू शकतो.
लक्ष्यात घ्या की, वाहन खरेदी करायचे म्हणजे पैसा जाणारच. त्यामुळे कोणतेही वाहन खरेदी करण्यापूर्वी त्याचा खर्च तसेच इंधनाचा खर्च, या गोष्टी लक्षात घेऊनच कोणतं वाहन खरेदी करायचं, हे ठरवा.