आगरताळा : त्रिपुरा सरकारने केवळ औद्योगिक वापरासाठी राज्यातील बांबू उत्पादनात शंभरपट वाढ करण्यासाठी पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत येत्या पाच वर्षांत बांबूचे सध्याचे ४६१.३२ हेक्टर क्षेत्र शंभरपटीने वाढवून ४५ हजार हेक्टरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशात अगरबत्तीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काड्यांपैकी ७० टक्के उत्पादन एकट्या त्रिपुरात होते.
त्रिपुरा बांबू मिशनचे (टीबीएम) अतिरिक्त संचालक सुभाषचंद्र दास ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाले,‘‘सध्या त्रिपुरात केवळ औद्योगिक वापरासाठी ४६१.३२ हेक्टर क्षेत्रावर बांबूचे उत्पादन केले जाते. यात २०२५-२६ पासून पुढील पाच वर्षांत ४५ हजार हेक्टरपर्यंत वाढ करण्याचे नियोजन आहे. दरवर्षी बांबूचे क्षेत्र नऊ हजार हेक्टरने वाढविले जाईल.
मिशनने २०१८-१९ ते २०२४-२५पर्यंत केवळ व्यावसायिक वापराच्या बांबूची उच्च घनतेची लागवड केली आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार त्रिपुरात बांबू लागवडीचे ४.२० लाख हेक्टर क्षेत्र असले तरी त्यातील बहुतेक भागात पातळ किंवा निकृष्ट दर्जाचे बांबू असून ते औद्यौगिक वापरासाठी उपयुक्त नाहीत.
त्यामुळे, औद्योगिक वापरासाठी उत्कृष्ट दर्जाचे बांबू सहज उपलब्ध करून देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत आहे. त्यासाठी त्रिपुरा बांबू लागवड विकास योजना आणली असून या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्यास व्यावसायिक बांबू उत्पादनाच्या विशेषत: वाहतुकीसह अनेक आव्हानांवर मात करता येईल,’’असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्योगांना बाबूंचा पुरवठा सहज शक्यसुभाषचंद्र दास म्हणाले, की दुर्गम, पर्वतमय प्रदेशातून बांबूची वाहतूक करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तुलनेने शहरी भागात खासगी जमिनीवर बांबूची लागवड केली जाते आणि अशा ठिकाणांहून बांबूची वाहतूक करण्यात कोणतीही अडचण येत नाही. त्याचप्रमाणे, अशा जमिनीवरील बांबू कापण्यासाठी वन विभागाच्या परवानगीचीही गरज नसते. त्यामुळे, या योजनेमुळे उद्योगांना अधिक सहजपणे बांबूचा पुरवठा करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
४.२० लाख हेक्टर
त्रिपुरातील बांबू लागवडीचे क्षेत्र
(२०२३ च्या आकडेवारीनुसार)
२१
ईशान्येकडील राज्यांतील बांबूच्या प्रजाती
२ लाख टन
त्रिपुरातील बांबूची वार्षिक गरज
४ लाख टन
दरवर्षी बांबूंची गरज वाढत आहे. त्रिपुरात बांबूवर आधारित आणखी उद्योग येत आहेत त्यामुळे, बांबू उत्पादन वाढविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यात २०२५-२६ पासून पुढील पाच वर्षांत ४५ हजार हेक्टरपर्यंत वाढ करण्याचे नियोजन आहे. दरवर्षी बांबूचे क्षेत्र नऊ हजार हेक्टरने वाढविले जाईल.
-सुभाषचंद्र दास, अतिरिक्त संचालक, त्रिपुरा बांबू मिशन