पाकिस्तानच्या पराभवानंतर मालवणात भारताविरुद्ध घोषणा देणाऱ्या परप्रांतीयांच्या बांधकामावर प्रशासनाचा फिरला 'बुलडोझर'
esakal February 25, 2025 05:45 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी (ता. २३) पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना शहरातील आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला.

मालवण : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) भारताने विजय मिळविल्यानंतर आडवण भागात परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप झाला. यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रशासनास पत्र दिल्यानंतर त्यांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. आज झालेल्या या कारवाईचे स्थानिकांनी पाठिंबा देत उत्स्फूर्त स्वागत केले.

याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी (Malvan Police) दिली. त्यात म्हटले आहे, आंगणेवाडी यात्रेतून रविवारी (ता. २३) रात्री ते माघारी परतले. शहरातील वायरी येथील मित्राकडे जात असताना ९.१५ वाजण्याच्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती. त्यातील एक मुलगा देशाच्या विरोधात (Ind vs Pak Match) घोषणा देत होता. त्याला याबाबत विचारणा केली असता तो पळून गेला. त्यानंतर तो हनुमान मंदिर येथे सापडला. त्याला पुन्हा विचारले असता त्याने आपल्या वडिलांना भेटा, असे सांगितले.

त्याच्या वडिलांची भेट घेत याची माहिती दिली असता त्यांनीही देशाच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली. याची माहिती मित्र हरेश पडते यांना दिल्यानंतर घटनास्थळी अवी सामंत, भाऊ सामंत, संतोष लुडबे, आप्पा लुडबे यांच्यासह दहा-पंधरा लोक जमा झाले. आम्ही सर्वांनी त्यांना देशाच्या विरोधात घोषणा देणे योग्य नसल्याचे सांगितले; मात्र त्यानंतरही त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या. त्यांच्या या कृत्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमांन्वये आडवण येथील किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान यांच्यासह अन्य एका मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले आहे. शिवाय तेथे अनेक गैरप्रकारही सुरू आहेत.

त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा, असे पत्र आमदार राणे यांच्या वतीने नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनास दिले होते. त्यानुसार प्रशासनाने अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. या कारवाईवेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश सारंग, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, उमेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी (ता. २३) पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना शहरातील आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत हिंदू समाज संतप्त बनला आहे. अशाप्रकारे जर कोणी देशद्रोही भूमिका घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आमदार नीलेश राणे, पालकमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे यांच्यासह महायुतीचे नेते यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेऊ. अनधिकृत सर्व बांधकामे तत्काळ हटविण्याची भूमिका राहणार आहे. देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे.

- दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष, शिंदे शिवसेना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.