Santosh Deshmukh Case : ...तर पाण्याचा घोटही घेणार नाही ! मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्रा; आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु
esakal February 25, 2025 07:45 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ७७ दिवस झाले असून याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. पण या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, यांसह अन्य मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आज सकाळी १० वाजल्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

आमच्या मागण्यांची जर दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. तसेच शिष्टमंडळाने दखल घेतली तर आंदोलन मागे घेऊ, असेही गावकऱ्यांनी सांगितले आहे. दोन दिवस आम्ही अन्नत्याग करणार आहोत. तिसऱ्या दिवसापासून आम्ही पाण्याचा त्याग करणार आहोत, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

गावकऱ्यांनी अन्नत्यागाचा पावित्रा घेतला आहे त्याच्याशी मी सहमत आहे. जोपर्यंत शिष्टमंडळ येत नाही आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल, असे धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

'या' आहेत ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

१)केजचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करण्यात यावने.

२)फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यात यावी त्याला कठोर शिक्षा व्हावी

३)या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्या यावी

४)संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.

५)वाशी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक घुले, पो.कॉ. दिलीप गित्ते, गोरख व दत्ता बिक्कड, हेड कॉ. यांचे सीडीआर तपासून यांना सहआरोपी करण्यात यावे.

६)आरोपींना फरार होण्यास मदत करणारे बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे,संभाजी वायबसे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करावे.

७)घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णाण्यात नेण्याऐवजी पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून नेला होता याची चौकशी करण्यात यावी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.