हिंजवडी, ता. २५ : बालेवाडी-महाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत पार पडलेल्या पाच दिवसीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयातील कार्यरत असलेले राष्ट्रीय खेळाडू व मारुंजी येथील अमोल बुचडे कुस्ती अकादमीचे पैलवान महेश घुले यांनी रौप्य पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत ७२ किलो वजन गटामध्ये महेश घुले यांनी प्रथम फेरीत आनंदू कृष्णन केरळ यांचा दोन विरुद्ध दहा अशा गुण फरकाने पराभव करून, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उत्तर प्रदेशच्या अजय सिंग यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. महेश घुले यांचा सामना आर. एस. बी. मुंबई संघाच्या अमोल कोंढाळकर यांच्याबरोबर झाला. या सामन्यात आठ गुणांच्या फरकाने विजयी होऊन घुले यांनी अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सुवर्ण व रौप्य पदकाचा सामना हरियाणाच्या असलम खान यांच्याबरोबर झाला. या सामन्यात सहा गुणांच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे घुले यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
घुले हे रुस्तम ए हिंद अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र राज्य शासनाचा कुस्ती संघ निवडण्यात आला. या संघामध्ये पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयातील महेश घुले ७२ किलो ग्रिको रोमन व गीतांजली काळे ५३ किलो महिला यांनी प्रथम क्रमांक मिळवून संघात स्थान पक्के केले होते.
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शासन यांच्या वतीने सचिवालय जिमखाना मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत विविध राज्यांचे २२ संघ व विविध वजन गटामध्ये ६५३ खेळाडू सहभागी झाले होते.