Godaghat cleanup : गोदाघाट परिसरातून स्वयंसेवकांकडून सातशे किलो कचऱ्याचे संकलन
esakal February 26, 2025 04:45 AM

पंचवटी- निरंकारी सदगुरुमाता सुदीक्षाजी महाराज व राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत प्रोजेक्टअंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियानांतर्गत पंचवटी येथे गोदावरी नदी परिसरात जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली. सुमारे पाचशे निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविकांनी भाग घेत सातशे वीस किलो कचऱ्याचे संकलन केले.

तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड व मनपा विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी संत निरंकारी फाउंडेशनच्या आठ शाखांमधून सुमारे साडेपाचशे स्वयंसेवक व निरंकारी बंधू- भगिनी सहभागी झाले होते. अभियानात सुमारे सातशे वीस किलो कचरा जमा करण्यात आला. घंटागाडीच्या साह्याने कचरा डेपो येथे जमा करण्यात आला.

संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले, की देशभरात राबविलेल्या अमृत प्रोजेक्ट परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. युवकांचा विशेष सहभाग हा अभियानाचा मुख्य आधार होता. दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहणार आहे. २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १६५० पेक्षा अधिक ठिकाणी दहा लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले. हे दृश्य केवळ प्राकृतिक स्वच्छतेपर्यंत सीमित न राहता, अंतर्मनाला निर्मळ आणि पवित्र करण्याऱ्या एका आध्यात्मिक यात्रेचे सुंदर प्रतीक बनले.

सदगुरू माताजींनी पाण्याच्या महत्त्व अधोरेखित करताना समजावले, की पाणी अमृतासमान आहे जे प्रकृतीने आपल्याला सर्वोत्तम उपाहाराच्या रूपात प्रदान केले आहे. त्याची स्वच्छता आणि संरक्षण ही केवळ एक जबाबदारीच नव्हे तर आमची स्वाभाविक सवय बनून गेली पाहिजे. बऱ्याचदा आपण अजाणतेपणे आपण वापरा व फेकून द्या अशा वस्तू व घाण जलस्रोतांमध्ये टाकून प्रदूषणात भर घालत असतो ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याच चिंतनातून प्रेरित होऊन ‘प्रोजेक्ट अमृत’सारख्या सामाजिक उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.