पिंपळगाव वाखारी- येथील देवळा मालेगाव रस्त्यावरील एम. के. पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर सोमवारी (ता. २४) पहाटे तीनच्या सुमारास तीन जणांनी पंपावरील कामगारास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम ६ हजार १४० रुपयांची जबरी चोरी करून येथून पळ काढल्याची घटना घडली. तिन्ही संशयिताविरोधात देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवळा मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील इंडियन ऑइलच्या एम. के. पेट्रोल पंपावर सोमवारी (ता.२४) पहाटे तीनच्या सुमारास सचिन बाळू आहिरे, रोशन बाळू आहिरे (दहिवड, ता. देवळा) व कुणाल संजय पवार ( कणकापुर, ता. देवळा) हे विना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवारीलाल यादव (वय ३०, रा. सुजनीपुर कत्रोवली ता. राणीगंज जिल्हा प्रतापगढ़ राज्य उत्तरप्रदेश, हल्ली रा. पिंपळगाव वाखारी) या पंपावरील कामगाराला पकडून खाली पाडले. त्याला मारहाण केली. यातील एकाने कोयता काढून धाक दाखविला व दुसऱ्याने त्या कामगाराच्या खिशातील ६१४० रुपये रोख रक्कम काढून पळवून गेले.
अजय बनवरीलाल यादव याच्या फिर्यादीवरून देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दखल घेत वरील तीनही संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायय्क पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. सोनवणे करीत आहेत. दहिवड येथील सचिन बाळू अहिरे यास मोबाईलवर ऑनलाइन जुगार खेळण्याचे व्यसन आहे. त्या व्यसनापायी तो चाळीस हजार रुपये हरला होता. घरचे जाब विचारतील या भीतीने त्याने पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा विचार केला. त्यासाठी त्याचा भाऊ रोशन अहिरे व कुणाल संजय पवार रा. कणकापूर यांना त्याच्या कटात सहभागी करून घेतले.