10th Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता वर्षातून दोन वेळा परीक्षा: CBSE चा निर्णय
Saam TV February 26, 2025 09:45 PM

देशात दरवर्षी लाखो-करोडो विद्यार्थी CBSE बोर्डातून दहावीची परीक्षा देत असतात. यातील काही विद्यार्थी उत्तीर्ण होतात, तर काही नापास होतात. नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, आता 2026 पासून हा पर्याय राहणार नाही. बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन संधी मिळतील, त्यामुळे त्यांच्यावर तणाव कमी होण्याची शक्यता आहे. बोर्डाने मंगळवारी या नव्या प्रणालीच्या मसुद्याला अंतिम मंजुरी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, CBSE बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर दुसरा टप्पा मे महिन्यात घेतला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. CBSE नुसार, वर्षातून दोनदा होणारी इयत्ता 10 वीची बोर्ड परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. मात्र, संबंधित विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन फक्त एकदाच घेतले जाईल. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. मात्र, या सुविधेसाठी विद्यार्थ्यांना अधिक परीक्षा शुल्क भरावे लागेल.

विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा?

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा कशी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार मिळेल. याचा अर्थ, विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा वेळ आणि पद्धत निवडण्याची मुभा दिली जाईल. जर विद्यार्थी दोनदा परीक्षेला बसले, तर त्यांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल.

सध्या, सीबीएसईने तयार केलेल्या मसुद्यानुसार, २०२५ च्या परीक्षेसाठी दोन टप्प्यात परीक्षा होईल. पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ या कालावधीत आणि दुसरा टप्पा ५ मे ते २० मे २०२५ दरम्यान होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षेला बसण्याची लवचिकता मिळेल.

शिक्षण पद्धतीत मोठा बदल

शिक्षण पद्धतीत मोठा बदल करण्यासाठी सीबीएसईने दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात एक आणखी बैठक झाली होती, ज्यामध्ये सीबीएसई, एनसीईआरटी आणि केव्ही (केंद्रीय विद्यालय) मध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीएसईच्या वेबसाइटवर , शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सामान्य लोक यांच्याकडून या धोरणाच्या मसुद्यावर अभिप्राय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मसुदा सीबीएसईच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला असून, लोक ९ मार्च २०२५ पर्यंत आपले मत देऊ शकतात.

Edited By - Purva Palande

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.