जावळीच्या घनगर्द हिरवाईत विसावलेल्या, अनवट वाटेवर असलेल्या अन् रम्य निसर्गाचा सहवास लाभलेल्या या स्वयंभू शिवमंदिरांविषयीची भाविकांना भुरळ आजही कायम आहे.
सातारा : सह्याद्रीच्या कुशीत स्थापित असलेली सप्तशिवालये म्हणजे जिल्ह्याचे आध्यात्मिक वैभव. पौराणिक अन् ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या या सप्तशिवालयांचे धार्मिक महत्त्व काळाच्या बदलत्या प्रवाहात आजदेखील अबाधित आहे. जावळीच्या घनगर्द हिरवाईत विसावलेल्या, अनवट वाटेवर असलेल्या अन् रम्य निसर्गाचा सहवास लाभलेल्या या स्वयंभू शिवमंदिरांविषयीची भाविकांना भुरळ आजही कायम आहे.
सप्तशिवालयांना सात शिवपुरी या नावानेही संबोधले जाते. मोळेश्वर, गाळदेव, धारदेव, घोणसपूर, पर्वत अन् चकदेव या ठिकाणी ती स्थापित आहेत. ही सारी अनवट वाटेवरची प्राचीन आध्यात्मिक स्थळे. त्यातील चकदेव, पर्वत येथील शिवमंदिरे ही घनगर्द जंगलात आहेत. तेथे पोचण्याची वाट खडतर आहे. त्यासाठी प्रसंगी शिवसागर ओलांडून जावे लागते. घोणसपूर येथील शिवमंदिरही दुर्गम भागात आहे. तळदेवचे मंदिर हे - तापोळा मार्गावर आहे. उर्वरित असणारी मोळेश्वर, गाळदेव, धारदेव येथील मंदिरे ही कास पठारावरून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या ऐतिहासिक राजमार्गाच्या परिसरात आहेत.
पर्वतचे जोम मल्लिकार्जुन मंदिरपर्वत तर्फ वाघावळे (ता. महाबळेश्वर) हे जिल्ह्याच्या सर्वात टोकावरचे गाव. त्यापलीकडे येतो तो रत्नागिरी जिल्हा. जिल्ह्यातील सर्वाधिक उंचावरचे ठिकाण म्हणूनही पर्वतचा उल्लेख होतो. इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराची गणना प्राचीन मंदिरांत होते. सह्याद्रीच्या उत्तुंग गिरीशिखरावर विराजमान झालेली जी शिवालये आहेत, त्यात या मंदिराचा समावेश होतो. समुद्रसपाटीपासून ४५०० फुटांहून अधिक उंचीवर हे शिवमंदिर आहे. भोवताली कोणतीही लोकवस्ती नसल्यामुळे हा परिसर शांत, एकांत आहे. या मंदिराची बांधणी हेमाडपंती असून, ती पाषाणामध्ये आहे.
परिसरात श्री जोम, श्री कोटी ही मंदिरे आहेत. स्वयंभू पिंड, दगडी नंदी इथे दिसतात. मंदिरामागे काही अंतरावर कांदाटी नदीचा उगम आहे. इथून दिसणारे सूर्यास्ताचे दर्शन विलोभनीय ठरते. मंदिराच्या प्रांगणातून भोवताली नजर टाकली, की उजव्या हाताला महाबळेश्वर. मग मधू मकरंदगड, त्यामागे प्रतापगड. डाव्या बाजूला चकदेव, महिमंडणनगडचा किल्ला. समोर उत्तेश्वरचा डोंगर. पूर्वेला कास पठार अन् कोयना- कांदाटी नद्यांचा संगम दिसतो. हे निसर्ग वैभव अनुभवताना नजरेचे पारणे फिटते.
कसे जाल?साताऱ्यातून बामणोली अन् मग लाँचने वा वाहनाने वाघावळे गावी पोचावे लागते. तिथून जंगलातील उंच चढण पुरी करत मंदिरस्थळी जावे लागते. कोकणातील भाविक रघुवीर घाटातून मार्गक्रमण करत मंदिरास भेट देतात.
साताऱ्यापासूनचे अंतर१२० किलोमीटर (महाबळेश्वरमार्गे)
घोणसपूरचे भैरी मल्लिकार्जुन मंदिरमधुमकरंदगड हा जिल्ह्यातील आडवाटेवरील किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घोणसपूर गावात मल्लिकार्जुन मंदिर आहे. गडावरही आणखी एक मल्लिकार्जुन मंदिर आहे. ते छोटेखानी आहे. मंदिरापुढे नंदी आहे. आतील बाजूस शिवलिंग, त्यावर तांब्याचा नाग आहे. मागे काळ्या पाषाणातील मल्लिकार्जुनाची मूर्ती आहे. मंदिरापुढे नंतरच्या काळात उभारलेला लहानसा मंडप आहे. तिथेच बाजूला एका उद्ध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्यावर एक लहानशी समाधीही पाहावयास मिळते.
कसे जाल?महाबळेश्वर- पोलादपूर या मुख्य मार्गावरून डाव्या हाताला वळले, की पार गावाकडे जाणारा रस्ता आहे. तिथून पुढे काही अंतरावर घोणसपूर आहे. हातलोट गावातूनही घोणसपूरला पोचता येते.
साताऱ्यापासूनचे अंतर९२ किलोमीटर (महाबळेश्वरमार्गे)
मोळेश्वर, गाळदेव, धारदेवमोळेश्वर, गाळदेव, धारदेव ही शिवालये साताऱ्याच्या टप्प्यात आहेत. ही तिन्ही मंदिरे एकाच मार्गावर अन् निसर्गवाटेवर आहेत. कास पठाराहून हा मार्ग सुरू होतो. महाबळेश्वरच्या सीमेवर तो संपतो. शिवकालीन राजमार्ग म्हणूनही तो सर्वपरिचित आहे. एका बाजूला शिवसागर अन् दुसऱ्या बाजूला कण्हेर धरणाचा जलाशय. रस्त्याकडेला सतत भिरभिरणाऱ्या उंचच उंच पवनचक्क्या नजरेस पडतात. सुरवातीलाच मोळेश्वरचे शिवालय आहे. शिवपार्वतीचे हे एकत्र असणारे मंदिर. ते अगदीच प्राचीन आहे. मंदिरापुढे दगडी स्तंभ अन् अखंड दगडात कोरलेला नंदी आहे. अलीकडच्या काळात जीर्णोद्धारीत करण्यात आलेले नवे मंदिरही येथे पाहावयास मिळते.
त्यानंतर येते ते म्हणजे गाळदेवचे शिवालय. मुख्य मार्गापासून ते थोडे आत आहे. गावातील घरे ओलांडून शेवटच्या टोकाला गेले, की गर्द वनराई येते. तिथे हे मंदिर दिसते. भोवताली दगडी तटबंदी आहे. गाभाऱ्यात कातळ कोरीव खांब आहेत. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर आजही तितकेच भक्कम आहे. तिथल्या गाळेश्वरचे दर्शन घेऊन पुढे आले, की मग धारदेवची वाट येते. रस्त्यालगतच हे मंदिर आहे. कार्तिक एकादशीला मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीलाही भाविकांची गर्दी असते.
कसे जाल?साताऱ्यातून कास पठार परिसरात असलेल्या एकीव गावातून पुढे तिन्ही मंदिरांकडे जाणारी डांबरी सडक आहे. मेढ्यातून कुसुंबी घाटमार्गे येणारा रस्ता सह्याद्रीनगरमध्ये येऊन मिळतो. तिथून पुढील मार्गावर ही तिन्ही मंदिरे आहेत. महाबळेश्वरमार्गे यायचे असेल तर ‘बगदाद पॉइंट’च्या बाजूने प्रथम धारदेवचे मंदिर येते.
साताऱ्यापासूनचे अंतरमोळेश्वर - ५० किलोमीटर
गाळदेव - ४० किलोमीटर
धारदेव - ५४ किलोमीटर
तळदेवचे तळेश्वर मंदिरतळदेव येथील शिवमंदिर हे तळेश्वर या नावाने ओळखले जाते. ते प्राचीन आहे. त्याचे बांधकाम दगडी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे. प्रांगणात असलेल्या नंदीचे तोंड पूर्वेला आहे. मंदिर परिसरात गणपती अन् हनुमानाच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे काळ्या पाषाणात आहे. मंदिराच्या निर्मितीत कोठेही लाकडाचा उपयोग केलेला नाही. मंदिराचे खांब हे एकाच दगडातून कोरलेले आहेत. मंदिराचा गाभारा हा रचनात्मकरीत्या बनविण्यात आला आहे. हेमाडपंतीय रचनेचे हे मंदिर आहे. मंदिराला लागूनच सभामंडप उभारलेला आहे. त्यावर ४० फुटी उंच कळस आहे.
कसे जाल?तळदेव हे आध्यात्मिक स्थळ महाबळेश्वर- तापोळा मार्गावर आहे. महाबळेश्वर अन् तापोळा या दोन्हीही ठिकाणाहून ते साधारण मध्यावर आहे.
साताऱ्यापासूनचे अंतर७० किलोमीटर महाबळेश्वरमार्गे
चकदेवचे शैल चौकेश्वर मंदिरसातारा जिल्ह्यातील अत्युच्च उंचावर जी मोजकी मंदिरे आहेत, त्यातील चकदेव येथील श्री शैल चौकेश्वर मंदिर. सभोवताली घनदाट जंगल अन् मधोमध असलेल्या डोंगराच्या सपाटीवर ते आहे. ते पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. ते ‘चौकेश्वर’ या नावाने ओळखले जाते. मंदिराचे बांधकाम हे कातळाच्या शिळांनी केले आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. पाठीमागे विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मूळच्या मंदिरासमोर अलीकडच्या काळात बांधलेला सभामंडप आहे. मंदिर परिसरात महापुरुषांची अनेक स्मृतिस्थाने पाहावयास मिळतात. दर वर्षी कार्तिकी एकादशीला इथे यात्रा भरते. महाशिवरात्रीलाही उत्सव भरतो. जिल्ह्यातील भाविकांबरोबरच कोकणवासीयांचेही ते श्रद्धास्थान आहे.
कसे जाल?चकदेवला जाणारा मार्ग बिकट आहे. त्यासाठी आधी साताऱ्यातून बामणोलीमार्गे जलविहार करून सिंधीत पोचावे लागते. कोकणातून रघुवीर घाट ओलांडून येणारा मार्गही आहे. तिसरी वाट आंबिवली गावातून वर येते. चौकेश्वर मंदिरापासून जाणारा रस्ता आपल्याला चकदेवच्या प्रसिद्ध शिड्यांकडे घेऊन जातो. या शिड्या पर्यटक अन् ट्रेकर्ससाठी आकर्षणस्थान बनल्या आहेत.
साताऱ्यापासूनचे अंतर१६५ किलोमीटर खेडमार्गे
सप्तशिवालयांच्या अवतीभवतीमधुमकरंदगड, महिमंडणगड, वासोटा हे किल्ले
महाबळेश्वर, तापोळा, बामणोली ही पर्यटनस्थळे
कास तलाव, ऐतिहासिक राजमार्ग, पवनचक्क्यांचे पठार
शिवसागराचा नजारा, कोयना- सोळशी- कांदाटी नद्यांचा संगम
खडतर प्रदेशात साकारलेला रघुवीर घाट