Mohammad Kaif on Pakistan Cricket Board: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ब गटातील सामन्यातील विजेता उपांत्य फेरी निश्चित करणार होता; परंतु अवेळी पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि स्पर्धेतील ब गटातील सर्व समीकरणे बिघडली.
पाऊस थांबलाच नसल्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली; परंतु पाऊस थांबला असता तरी मैदान ओलरस राहिले असते आणि खेळ सुरू होणे कठीणच होते, अशी शक्यता होती, कारण रावळपिंडी मैदान पुर्णत: झाकण्यात आले नव्हते. उर्वरित मैदान पावसात ओलसर झाले होते. आयसीसीची स्पर्धा असताना केवळ तुटपुंजे अच्छादन असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळावर टीका करण्यात येत आहे. आयसीसी या स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठा निधी दिलेला आहे; पण पुरेशी आच्छादने का आणली नाहीत, अशी विचारणा केली जात आहे.
यात आता भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. "रावळपिंडीचे मैदान पूर्णपणे झाकलेले नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध ऑस्ट्रेलिया असा हा महत्त्वाचा सामना होता. कदाचित पाण्याचा निचरा झाला असता. कारण कोणीही या समस्येकडे लक्ष दिले नाही. आयसीसीचा पैसा यजमानांनी हुशारीने वापरला का?" असे खडेबोल भारताच्या माजी क्रिकेटपटूने पीबीसीला सुनावले.
दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया सामना पावसाने रद्द झाल्याचा परिणाम गटातील गुणांवर होणार आहे. तसे बघायला गेले तर मंगळवारच्या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरी गाठणार होता. आता अवस्था अर्धवट झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा शेवटचा साखळी सामना अफगाणिस्तानसमोर होणे बाकी असल्याने त्यांना जरा जास्त संधी वाटते आहे. उलटपक्षी दक्षिण आफ्रिका संघाला इंग्लंडला पराभूत करणे गरजेचे होणार आहे. पहिला सामना गमावूनही खरी संधी इंग्लंडला निर्माण होणार आहे.
दक्षिण आफ्रिकन संघाला पराभूत करून इंग्लंड संघही आता उपांत्य फेरी गाठण्याची अपेक्षा मनात बाळगू शकतो. ऑस्ट्रेलियन संघाने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करूनसुद्धा त्यांच्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट जास्त आहे ज्याचा परिणाम ब गटातील कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार याच्यावर होणार आहे. थोडक्यात ब गटातील सर्व संघांची धडधड पावसाने रद्द झालेल्या सामन्याने वाढवली आहे.