Cinema Hall Fire: सिटी मॉलच्या सिनेमा हॉलमध्ये 'छावा' चित्रपटादरम्यान आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी, लोकांमध्ये घबराट
esakal February 27, 2025 01:45 AM

दिल्लीतील साकेत येथील प्रसिद्ध सिलेक्ट सिटी मॉलमधील एका सिनेमा हॉलमध्ये आग लागली. बुधवारी (२६ फेब्रुवारी) घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दिल्ली अग्निशमन सेवेने ही माहिती दिली. छावा चित्रपटादरम्यान हे घडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सिलेक्ट सिटी मॉलमधील एका सिनेमा हॉलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे. 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मॉलमधील पीव्हीआर सिनेमाच्या चित्रपटगृहाच्या एका कोपऱ्याला आग लागल्याने चित्रपटगृहातील प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. सायंकाळी ५.४२ वाजता ही आग लागली आहे.

हॉलमध्ये अग्निशामक अलार्म वाजू लागल्याने सर्वजण बाहेर पडण्याच्या दाराकडे धावले. सिनेमा हॉल रिकामा करण्यात आला. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने काम करून आग आटोक्यात आणली.सिलेक्ट सिटी मॉलमधील पीव्हीआर ऑडी-३ सिनेमाच्या स्क्रीनला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत ही दिलासादायक बाब आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु घटनेच्या वेळी मॉलमध्ये जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, "या संपूर्ण घटनेत कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही. आग खूपच लहान होती आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच त्यावर नियंत्रण मिळवले."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.