आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने इब्राहीम झाद्रान याच्या 177 धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर 326 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने या धावांचा शानदार पाठलाग करत 49 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 313 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 धावांची तर अफगाणिस्तानला 1 विकेटची गरज होती. मात्र अझमतुल्लाह ओमरझई याने शेवटच्या ओव्हरमधील 4 चेंडूत 4 धावा दिल्या. तर पाचव्या चेंडूवर आदिल रशीद याला इब्राहीम झाद्रान याच्या हाती कॅच आऊट केलं. इंग्लंडचा डाव यासह 49.5 ओव्हरमध्ये 317 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने अशाप्रकारे विजय मिळवला. तर या पराभवासह इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून अधिकृतरित्या बाहेर झालीय.
इंग्लंडसाठी जो रुट याने सर्वाधिक 120 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या काही फलंदाजांनी प्रतिकार करत बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडला काही अंतराने झटके दिले. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळूनही विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. इंग्लंडकडून प्रमुख फलंदाजांपैकी जेमी स्मिथ यालाच दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर फिलिप सॉल्ट 12, बेन डकेट 38, हॅरी ब्रूक 25, कॅप्टन जोस बटलर 38, लियाम लिविंगस्टोन 10, जेमी ओव्हरटन 32 आणि जोफ्रा आर्चर याने 14 धावा केल्या. ज्यामुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. मात्र अझमतुल्लाह याने पहिल्या 4 चेंडूत 4 धावा दिल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर आदिल रशीद याला आऊट करताच इंग्लंडचा डाव आटोपला आणि अफगाणिस्तान विजय मिळवला.
अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह ओमरझई याने 58 धावांच्या मोबदल्यात 9.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठला. अनुभवी मोहम्मद नबी याने 2 विकेट्स घेतल्या. तर फझलहक फारुकी, राशिद खान आणि गुलाबदीन नईब या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तसेच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी चिवट फिल्डिंग करत 1-1 धाव बचावली, परिणामी अफगाणिस्तान 8 धावांनी विजयी होऊ शकली.
त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने अफगाणिस्तानला झटपट झटके दिले. त्यामुळे अफगाणिस्तानची 3 बाद 37 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र तिथून अफगाणिस्तानने कमबॅक केलं आणि 320 पार मजल मारली. इब्राहीम झाद्रान हा अफगाणिस्तानला 300 पार पोहचवणारा खरा सूत्रधार ठरला. झाद्रान याने 146 चेंडूत 6 सिक्स आणि 12 चौकारांसह 177 धावा केल्या. तर कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी आणि मोहम्मद नबी या दोघांनी प्रत्येकी 40-40 धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझई याने 41 धावांचं योगदान दिलं. मात्र इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लियाम लिविंगस्टोन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जेमी ओव्हरटन आणि आदिल रशीद या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद आणि मार्क वुड.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.