वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 11व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. या सामन्यात युपी वॉरियर्सचा 8 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबई इंडियन्सच्या फायद्याचा ठरला. मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सन 20 षटकात 9 गडी गमवून 142 धावांवर रोखलं. युपी वॉरियर्सने दिलेलं 142 धावांचं आव्हान मुंबई इंडियन्सने 2 गडी आणि 18 चेंडू राखून पूर्ण केलं. मुंबईला यास्तिका भाटीयाच्या रुपाने पहिला धक्का बसला. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही. पण हिली मॅथ्यूज आणि नॅट स्कायव्हर ब्रंट या जोडीने विजय मिळवून दिली. दोघांनी 132 धावांची भागीदारी केली. हिली मॅथ्यूजने 50 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. तर नॅट स्कायकव्हरने 44 चेंडूत 13 चौकाराच्या मदतीने नाबाद 75 धावा केल्या. हरमनप्रीत कौर फलंदाजीला आली आणि एका चेंडूत चौकार मारून संघाला विजयी केलं. या विजयासह मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्सने 4 पैकी 3 सामने जिंकत 6 गुण आणि +0.780 नेट रनरेटसह पहिलं स्थान पटकावलं आहे.
युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्मा हिने सांगितलं की, ‘आम्ही सलग दोन विकेट गमावल्या आणि जर आम्हाला भागीदारी मिळाली असती तर आम्ही 160-170 पर्यंत पोहोचू शकलो असतो. पॉवरप्लेमध्ये तिची ताकद दाखवण्याची तिची भूमिका होती आणि तिने ते उत्तम प्रकारे केले. आम्ही आणखी मजबूत होऊन परत येऊ. या पराभवातून काही गोष्टी शिकायला मिळतात. आम्हाला मधल्या फळीत भागीदारी वाढवण्यावर काम करण्याची गरज आहे.’
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, वृंदा दिनेश, दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, उमा चेट्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, सायमा ठाकोर, क्रांती गौड.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, जिंतीमणी कलिता.