बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या, अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावरील भांडणाप्रकरणी अॅट्रॉसिटी, याच कंपनीच्या प्रकल्पाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) विशेष तपास पथकाने गुरुवारी आठ जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले. येथील ‘मकोका’ विशेष न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या न्यायालयात सादर केलेले हे आरोपपत्र सुमारे दीड हजार पानांचे आहे.
शासनाच्या विधी व न्याय विभागाने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची बुधवारी (ता. २६) नियुक्ती केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विशेष तपास पथकाचे प्रमुख व गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली, पथकाच्या किरण पाटील, तपास अधिकारी अनिल गुजर, विशेष सहायक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे आदींनी हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार व सिद्धार्थ सोनवणे यांच्याबाबतच्या हत्या, खंडणी व ॲट्रॉसिटी या तिन्ही गुन्ह्यांच्या तपासाचा अंतर्भाव आहे.
संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर २०२४ ला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरारी आहे. ११ डिसेंबरला अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या संबंधितांना धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरुन वाल्मीक कराड तसेच हत्या प्रकरणातील विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, विशेष तपास पथकाने वाल्मीक कराड याच्यावरही हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवला आहे.
खुनाच्या घटनेपूर्वी सहा डिसेंबरला सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे यांनी अवादा कंपनीच्या मस्साजोग येथील प्रकल्पस्थळी भांडण केले होते. तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. याबाबत उशिरा गुन्हा नोंद झाला होता. केज पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. विशेष तपास पथकाने आठ आरोपींबाबतचा तपास पूर्ण करून आरोपपत्र तयार केले.
कृष्णा आंधळे फरारीचसंतोष देशमुख हत्या, ॲट्रॉसिटी या गुन्ह्यांत कृष्णा आंधळेचा समावेश आहे. तो फरारी असून घटनेच्या ८० दिवसांनंतरही पोलिसांना तो सापडलेला नाही. त्यामुळे उर्वरित आरोपींबाबतचा तपास पूर्ण करून तपास पथकाने आरोपपत्र सादर केले.