बॉलिवूड अभिनेत्री आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्स या संघाची सहमालकिन प्रीति झिंटा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर बरेच फॅन्स असून ती जसा वेळ मिळेल तसा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असते. पण एका पोस्टला उत्तर देताना प्रीति झिंटाचा तोल घसरला आणि वादाची ठिणगी पेटली. प्रीति झिंटाने पोस्टला उत्तर देताना विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला आणि संतापाची लाट पसरलीय. ‘प्रेम आणि नात्याने भरलेल्या जीवनात कधीही तडजोड असू शकत नाही. मला भारताची आठवण येते पण फक्त तिथे राहण्यासाठी मी दुःखी आणि विषारी नात्यात राहणे पसंत करेन की परदेशात आनंदी आणि प्रेमळ नात्यात राहणे पसंत करेन? हा एक अतिशय सोपा पर्याय आहे. एकदा हा पूल ओलांडला की ते खूप सोपे होते.’, अशी पोस्ट प्रीति झिंटाने सोशल मीडियावर केली. यावर एका युजर्सने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तसेच नकारात्मक प्रतिक्रिया दिली.
ट्रोल करणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर विराट कोहलीचा फोटो होता. त्यावर प्रीति झिंटाने त्याला खडे बोल सुनावले आणि विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला. ‘जो आपलं तोंड दाखवायच्या लायकीचा नाही तो विराट कोहलीच्या फोटोचा वापर करत आहे. त्याला कमेंट्स करण्याचा अधिकार नाही.’ त्यानंतर ट्रोलरने आपला फोटो बदलून कुत्र्याचा फोटो ठेवला. पण प्रीति झिंटाच्या उत्तराने विराट कोहलीचे चाहते नाराज झाले. ट्रोलर्सला उत्तर देताना विराट कोहलीला मधे का आणलं? असा प्रश्न विचारला. एका युजर्सने उत्तर देताना लिहिलं की, त्याने विराट कोहलीचा फोटो कुठे लावला आहे. उत्तर देताना अतिरेक होत आहे याचं भान ठेवा.
प्रीति झिंटाने विराट कोहलीच्या चाहत्यांचा रोष पाहता स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कृपया असं काही बोलू नका. मी विराटचा खूप आदर करतो. त्याने ट्रोल करण्यापूर्वी विराट फोटो लावला होता. त्यामुळे मी असं बोलले.’ आता स्पष्टीकरणानंतर हे प्रकरण शांत होतं की विराट कोहलीचे चाहते या प्रकरणाला आणखी काही वेगळा रंग देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण ट्रोलर्संना उत्तर देताना काळजी घेतली पाहीजे हे मात्र या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे.