
हिंदुस्थानी शेअर बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. हा शुक्रवार गेल्या पाच महिन्यांतील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांसाठी सर्वात वाईट दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवर अतिरिक्त 10 टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. यातच बीएसई सेन्सेक्स 1,414 अंकांनी आणि एनएसई निफ्टी 420 अंकांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. 1996 नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे.
बीएसई सेन्सेक्स 1,414.33 अंकांनी घसरून 73,198.10 वर बंद झाला. तर निफ्टीत सलग आठव्या दिवशीही घसरण झाली. यातच निफ्टी 420.35 अंकांनी घसरून 22,124.70 वर बंद झाला. गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी 85,978.25 च्या विक्रमी पातळीवर पोहोचलेला सेन्सेक्स आतापर्यंत 12,780.15 अंकांनी घसरला आहे. निफ्टी देखील 26,277.35 च्या विक्रमी उच्चांकावरून 4,152.65 अंकांनी घसरला आहे.