पद्मश्री नामदेव ढसाळ यांची अवहेलना करणाऱ्या सेन्सर बोर्ड अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा, युवा पँथर संघटनेची मागणी
Marathi February 28, 2025 09:24 PM

दिग्दर्शक महेश बनसोडे यांच्या “चल हल्लाबोल” या सिनेमा बाबत गेल्या चार महिन्यापासून सेन्सॉर बोर्ड आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये कलगीतुरा चालू आहे. एवढ्यातच सेन्सर बोर्ड अधिकाऱ्याने अकलेचे तारे तोडत कोण नामदेव ढसाळ? अशा आशयाची नोटीस महेश बनसोडे यांना दिली. त्यामुळे युवा पँथर संघटना आक्रमक झाली असून सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोस्टर प्रदर्शन करीत आंदोलन केले.

त्या सेन्सर बोर्डच्या अधिकारी निरीक्षक यांना जर दलित साहित्यामध्ये आणि मराठी साहित्याला विद्रोहाचा आयाम देणारे पद्मश्री नामदेव ढसाळ माहित नसतील, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा काडीमात्र अधिकार नाही. नोटीशी मध्ये कोण नामदेव ढसाळ असे बोलत जर ढसाळ यांच्याबद्दल अपमान जनक वाच्यता करत असतील, तर त्यांनी मराठी आणि विद्रोही साहित्याचा अपमान केला आहे. याने महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांची मनं दुखवली गेली आहेत. मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देऊन त्याला सातासमुद्रापलीकडे नेऊन उपजत मराठी रसातळातील मराठीचे दर्शन घडवून देणाऱ्या शोषित पिढीताचा आवाज असणाऱ्या दलित पॅंथरचा लढा उभा करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अपमान करू पाहणाऱ्या सेन्सर बोर्डवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, यासाठी युवा पँथर संघटनेच्या वतीने सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोस्टर प्रदर्शन करीत आंदोलन केले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आतिश बनसोडे, कार्याध्यक्ष आकाश चंदनशिवे, मनोज डी, प्रज्वल पी.पी, रोहन सर्वगोड, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.