School boy death : ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलगा ठार; पन्हाळ्यातील आंबवडे येथील दुर्घटना
esakal March 01, 2025 02:45 AM

पन्हाळा : कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबवडे ते मिठारवाडी रोडवर ट्रॅक्टरखाली सापडून शौर्य रवींद्र निगडे (वय १२, रा. आंबवडे) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. अपघाताची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली आहे. ट्रॅक्टरचालक शिवाजी रवींद्र थोरात (वय २५, रा. मौज, ता. जि. बीड) याला पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ट्रॅक्टरचालक शिवाजी थोरात हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून, तो वारणा साखर कारखाना ऊस वाहतुकीसाठी आला आहे. आज हंगाम आटोपून तो साहित्यासह आपल्या गावी जात होता. या परतीच्या प्रवासात त्याची रिकामी ट्रॅक्टर ट्रॉली भरधाव वेगाने मिठारवाडीहून आंबवडेच्या दिशेने जात होती. त्याच रस्त्यावरून शौर्य हा आपल्या सायकलवरून घरी जात होता.

यावेळी ट्रॅक्टरने सायकलीस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत सायकलसह शौर्य खाली पडला. त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आंबवडे गावच्या यात्रेचा आज दुसरा दिवस असल्याने शौर्यच्या घरातील सर्व जण देवदर्शनासाठी घरातून निघाले होते. त्याचवेळी घरापासून काही अंतरावर हा दुर्दैवी अपघात घडला. एकुलता एक असलेल्या शौर्यच्या अपघाती मृत्यूने घरासह गावावर शोककळा पसरली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.