अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करत रंगत आणली. मात्र शुक्रवारी 28 फेब्रुवारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे यासह एकूण 4 गुण झाले आणि कांगारु उपांत्य फेरीत पोहचले. मात्र यानंतर अफगाणिस्तानला उपांत्य फेरीतील आशा कायम आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यानेही प्रार्थना केली. चॅम्पियन्स ट्रॉफीत 1 मार्चला दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. इंग्लंडने हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यास अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहचेल. त्यामुळे हशमतुल्लाह शाहीदी याने इंग्लंडच्या विजयासाठी प्रार्थना केलीय. हशमतुल्लाह सामना रद्द झाल्यानंतर काय म्हणाला? जाणून घेऊयात.
“दुर्देवाने सामन्याचा काही निकाल लागला नाही. हा एक चांगला सामना होता. आम्हाला 300 पेक्षा अधिक धावा करायला हव्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाने मधल्या षटकांमध्ये उत्तम गोलंदाजी केली. 270 चांगला स्कोअर होता, मात्र आम्ही बॉलिंगने चांगली सुरुवात करु शकलो नाहीत. आम्ही यातून धडा घेऊ”, असं हशमतुल्लाह शाहिदी म्हणाला.
हशमतुल्लाह शाहिदी याने सामना रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानचा ऑलराउंडर अजमतुल्ला ओमरझई याच्या कामिगिरीवर भाष्य केलं. “ओमरझई फर्स्ट क्लास प्लेअर आहे, त्यामुळेच त्याला आयसीसीकडून वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तो आमच्यासाठी कायमच चांगली कामगिरी करतो. त्याने इंग्लंडविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. तसेच आजही तो सकारात्मकरित्या खेळला. माझ्यासाठी फलंदाज म्हणून आजचा दिवस चांगला राहिला नाही. मी कुठे चुकलो? याबाबत मी कोचसह चर्चा करेन. स्ट्राईक रेटनुसार ही फार संथ खेळी होती. यातून धडा घेऊ. स्पर्धेत काय घडेल, याबाबत तुम्ही काहीच सांगू शकत नाही. इंग्लंड मोठ्या फरकाने जिंकेल, अशी आशा आहे”, अशी आशा हशमतुल्लाह यांनी व्यक्त केली.
दरम्यान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 207 धावांनी पराभूत केलं किंवा 11.1 षटकात विजयी आव्हान पूर्ण केलं तर अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहचेल.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.