पाहुण्यांची खोली
esakal March 01, 2025 09:45 AM

डॉ. राजश्री पाटील - प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ

‘आमच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता असतो,’ असं कौतुकानं सांगणारी माणसं आहेत. मोठ्या शहरांमध्येसुद्धा अशी घरं अस्तित्वात आहेत. आतिथ्य करणं हा गृहस्थधर्म मानला जातो. तिथी, वार न कळवता, आगंतुकपणे येणारा तो अतिथी. पूर्वी अनाहूतपणे येणाऱ्या माणसांचंसुद्धा स्वागत केलं जायचं. एवढंच काय, अगदी पांथस्थाला सुद्धा अन्न दिलं जायचं. भारतीय संस्कृती पाहुण्यांना देव मानणारी. ‘अन्नदाता पाककर्ता सुखीभव’ असं सहज म्हणत कोणी कधीही आलं तर त्या व्यक्तीला देण्यासाठी घरात अन्न असावं ही तत्कालीन गृहिणींची धारणा होती. या धारणेमागील सकारात्मकता सुखावह आहे. जगण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढलेला असतानाही चतकोर भाकरी/पोळी ‘उरवून’ ठेवण्याची रीत अनेक घरामध्ये पाळली जाते. ही आपली संस्कृती आहे.

दळणवळणाची साधनं अगदीच मर्यादित होती, वेग कमी होता आणि पैसा, प्रसिद्धी यांना म्हणावी इतकी प्रतिष्ठा नव्हती, तेव्हा अतिथी येणं, त्यांचं स्वागत होणं, ही नित्याची बाब होती. त्यांत विशेष काही केलं हा भाव दोन्ही बाजूंनी फारसा नसेच अशा प्राचीन मध्ययुगीन काळी, फक्त राजप्रसादातच पाहुण्यांसाठी खास कक्ष असत. थोडक्यात, मोठ्या माणसांची मोठी घरं आणि त्यांत पाहुण्यांसाठीसुद्धा विशेष खोल्या असत. त्याचं यथोचित आदरातिथ्य केलं जाई. ‘फोर्ब्ज’च्या यादीत नाव असणाऱ्या बलाढ्य भारतीयांच्या घरातील अतिथी कक्षाच्या अनेक कथा आपण वाचलेल्या ऐकलेल्या असतात. जिमसह अनेक सोयीसुविधांनी युक्त या खोल्या प्रशस्त असतात. घराच्या मालकाच्या खोलीइतकी नसेल कदाचित; पण ही पाहुण्यांची खोली सुंदर असते हे नक्की. तिला बाल्कनी असते. प्रायव्हेट पूल असू शकतो, तेवढ्यापुरती बागसुद्धा असू शकते!

शहरी मध्यमवर्गीय/उच्च मध्यवर्गीय सदनिकांमध्ये गेस्ट रूम असते. येथे येणारे पाहुणे हे अनेकवेळा कामानिमित्तच आलेले असतात. कधी कधी दवाखाना हे महत्त्वाचं आणि काळजीचं कारणही त्यांच्या येण्यामागे असू शकतं. अशा वेळी आपलं संपूर्ण घर, विशेषतः स्वयंपाकघर त्यांना आपलं वाटावं अशी वातावरणनिर्मिती आपण करावी. अशा माणसांच्या उबदार घरांमुळे निराशा, चिंता मोठ्या प्रमाणात कमी होते. अनेकवेळा महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षाचं केंद्र या कारणामुळेही पाहुणे येतात. परीक्षार्थींना बरं वाटावं, असा मोकळेपणा आपल्या घरात असावा.

पाहुण्यांच्या खोलीत दोन सिंगल बेड किंवा क्वीनसाईज बेड असावा. खोलीच्या आकारमानाप्रमाणे हे ठरवावे. या खोलीत टेलिव्हिजन सेट असावा, पाहुण्यांना आपल्या आवडीचे कार्यक्रम पाहण्याचं स्वातंत्र्य मिळावं याची व्यवस्था आपण करावी. इथल्या बेडखाली, सामान साठवण्याच्या ट्रॉलीज कराव्यात. अधिकची अंथरण्याची/पाघरण्याची वस्त्रं इथं ठेवता येतात. टेलिव्हिजन सेटखाली एखादं लहानसं कपाट असावं. याला स्लायडिंग दरवाजे करणं हा चांगला पर्याय आहे.

जागा कमी वाटते आणि वस्तू ठेवण्याची सोयही होते. किमान दोन तरी ओपन शेल्व्हज असावीत. त्यांवर पुस्तके असावीत. पाहुण्यांच्या प्रकृतीप्रमाणे ती बदलून बदलून ठेवता आली तर छानच. पुस्तकांजवळ एखादी लहानशी घरात वाढणाऱ्या (सावलीत वाढणाऱ्या) लहानशा रोपाची कुडी असावी. जमल्यास, जागा असल्यास, खिडक्यांमध्येही दोन-चार कुंड्या ठेवाव्यात. ओपन शेल्फवर सुगधी मेणबत्तीही ठेवावी. यामुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात.

या खोलीतील कपाटाची रचना जरा वेगळी असावी. पाहुण्यांच्या सूटकेसेस, ट्रॅव्हल बॅग्ज नीट बसाव्यात याची काळजी घेतली जावी. हँगर्स, बार्स व्यवस्थित लावलेले असावेत. खुर्ची, कॉफीटेबल ठेवण्याइतपत खोलीत जागा असेल, ही रचनासुद्धा करावी. या खोलीच्या स्नानगृहात न वापरलेले, कोरे टूथब्रश नेहमी असू द्यावेत. शॉवरजेल, शॅम्पू, स्वच्छ धुतलेले टॉवेल्स, नॅपकिन्स ठेवावेत.

थोडक्यात काय, तर कधीतरी वापरली जाते म्हणून या खोलीकडे दुर्लक्ष करू नये. तिला अडगळीची खोली तर मुळीच करू नये. कारण, ही आपली संस्कृती नव्हे..!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.