Entertainment News : महाराणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. ‘रणरागिणी ताराराणी’ हे नाटक आता रंगभूमीवर आलेले आहे. या नाटकाची संकल्पना चंद्रकांत सावंत यांची असून, निर्माते ब्रिगेडियर सुधीर सावंत आहेत. लेखन युवराज पाटील, तर दिग्दर्शन विजय राणे यांचे आहे. या ऐतहासिक नाटकाच्या एकूणच प्रवासाबद्दल निर्माते ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि दिग्दर्शक विजय राणे यांच्याशी केलेली बातचीत..
‘रणरागिणी ताराराणी’ हे तुमचे नाटक आता रंगभूमीवर आलेले आहे. ताराराणी यांच्या एकूणच जीवनप्रवासावर आधारित नाटक करावे, असे तुम्हाला का वाटले?निर्माते ब्रिगेडियर सुधीर सावंत : रणरागिणी ताराराणी या भारतातील सर्वांत कर्तृत्ववान स्त्रियांपैकी एक होत्या. एकेकाळी त्यांनी स्वराज्य सांभाळले. त्या खूप लढवय्या होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी स्वराज्याचा कारभार सांभाळून औरंगजेबाला रोखले. १७०० ते १७०७ पर्यंत मराठ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाशी लढाई केली. १६८० पासून औरंगजेब आणि मराठ्यांमध्ये सुरू झालेल्या संघर्षात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज (ज्यांनी अकरा वर्षे लढाई केली) आणि त्यानंतर ताराराणी होत्या. ताराराणी एक उत्कृष्ट योद्धा आणि महाराणी असूनही त्यांना आजवर दुर्लक्षित करण्यात आले. अनेकांनी त्यांच्या विरोधात खेळी खेळल्या. त्यामुळे त्यांची ओळख लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. शाळा-कॉलेजच्या इतिहासाच्या पुस्तकांतही त्यांचा फारसा उल्लेख नाही, ही मोठी शोकांतिका आहे, पण जिने मराठा साम्राज्य वाचवले आणि ज्यांच्यामुळे मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला, त्यांचीच कहाणी लोप पावली. एक सैनिक म्हणून मला याची खंत वाटते. त्यांच्या युद्धतंत्राचा अभ्यास मी कमांडोंना शिकवला आहे. तेव्हापासूनच माझ्या मनात महाराणी ताराराणी यांच्यावर आधारित सीरिज किंवा नाटक काढावे, असा विचार घोळत होता आणि आता तो पूर्ण झाला आहे.
तुमच्या या नाटकात महाराणी ताराराणींचा नेमका किती आणि कोणता इतिहास दाखविला आहे?सावंत : आमच्या या नाटकाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून होते. छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षे लढले आणि त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर मराठे पेटून उठले. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले. त्यांना प्रवासात कर्नाटकातील राणी चेन्नम्मा यांनी मदत केली, हेही आम्ही दाखवले आहे. काही काळानंतर सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाले. त्या वेळी औरंगजेबाला वाटले की आता तरी मराठे संपले; पण ताराराणी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि मराठ्यांना धैर्य व धाडस दिले. त्यानंतरच्या सात वर्षांत त्या अविरत लढल्या.
ऐतिहासिक नाटक करताना मोठी जबाबदारी असते. या नाटकासाठी तुम्ही कोणते संशोधन केले?दिग्दर्शक विजय राणे : सुधीर सावंत सरांचा इतिहासाचा खूप दांडगा अभ्यास आहे. शिवाजी मंदिर ट्रस्टचे चंद्रकांत सावंत आणि सुधीर सावंत यांची ही संकल्पना होती. त्यांनी ठरवले की महाराणी ताराराणी यांच्यावर आधारित नाटक करावे. खासदार असताना सुधीर सावंत यांनी हे काम सुरू केले. ताराराणी यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांचे सखोल वाचन करण्यात आले. संभाजी महाराजांपर्यंतचा इतिहास लोकांना ठाऊक आहे, पण त्यानंतर काय झाले, हे फार कमी जणांना माहीत आहे. त्यामुळे ताराराणींचा इतिहास दाखवताना छत्रपती राजाराम महाराजांचा उल्लेख करणे आवश्यक होते. अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये राज्याभिषेक हा शेवट मानला जातो, पण त्यानंतर महाराजांनी किती मोहिमा हाती घेतल्या, हे दाखवले जात नाही. या नाटकाद्वारे आम्ही ते दाखवले आहे. या नाटकाचा गाभा म्हणजे संभाजी महाराजांची हत्या ते औरंगजेबाचा मृत्यू. त्यात छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी आणि त्या काळातील लढाऊ सैनिकांचा इतिहास उलगडला आहे. सध्या ‘छावा’ चित्रपट गाजतोय आणि त्यामुळे देशभक्तीची भावना निर्माण झाली आहे. ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर काय झाले असेल, हे जाणून घ्यायचे आहे, त्यांनी हे नाटक नक्की पाहावे.
कलाकारांची निवड कशी करण्यात आली?राणे : कलाकार निवडताना ठरावीक प्रक्रिया पाळली जाते, तीच आम्हीही पाळली. ताराराणींची वेशभूषा परिधान केल्यावर ज्या कलाकाराला ती शोभेल, त्याचा विचार केला. त्यानंतर त्यांचा अभिनय आणि वाचन तपासण्यात आले. तनिषा वर्दे हिने ताराराणींची भूमिका साकारली आहे. तिने उत्तम काम केले आहे. जवळपास चाळीस ते पन्नास कलाकार या नाटकात काम करीत आहेत आणि सगळ्यांनी उत्तम काम केले आहे.
ऐतिहासिक नाटक असो वा चित्रपट त्यावरून कधी कधी वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असते. याबाबत तुम्ही काय सांगाल?सावंत : ते साहजिकच आहे. वास्तव सोडून किंवा संदर्भ बदलून काही केले, तर वाद निर्माण होतात, मात्र आम्ही सखोल ऐतिहासिक अभ्यास केला आहे. त्यामुळे वाद निर्माण होणार नाहीत.
राणे : या नाटकात कोणतीही ऐतिहासिक लिबर्टी घेतलेली नाही. रंगभूमीच्या सेन्सॉर बोर्डाकडून संहितेला मान्यता मिळाली आहे. संवादांमध्ये कुणालाही ठेच पोहोचणार नाही, याचीही दक्षता घेतली आहे.
ऐतिहासिक नाटक म्हटलं की मोठा तामजाम असतो. खूप मोठा खर्च येतो. मग ही आर्थिक गणिते तुम्ही कशी काय जुळवलीत?सावंत : या नाटकात पन्नास कलाकार काम करीत आहेत. त्यामुळे आर्थिक गणितं बघावीच लागतात. आमचे नेतेमंडळी, अभ्यासक आणि संस्था आहेत. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं. हे नाटक त्यांच्यामुळेच शक्य झालं, असं मी म्हणेन.
महाराणी ताराराणींचा इतिहास मोठा आहे. तो दोन-अडीच तासांत कसा दाखवणार?सावंत : आम्ही त्यांच्या आयुष्यातील मुख्य घटना शोधून त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या इतिहासाचे वाचन करून त्यात काय काय दाखवायचं याबद्दल आम्ही चर्चा केली आणि ते दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या रंगभूमीवर कौटुंबिक आणि विनोदी नाटके अधिक चालतात. मग असे असताना ऐतिहासिक नाटक करण्याचे कारण काय?राणे : सुधीर सावंत सरांचे स्वप्न होते की ताराराणींवर काही तरी करावे. त्यांनी अनेक वर्षे त्यावर अभ्यास केला आहे आणि त्यामुळे हे करायचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यावर अनेक चित्रपट आणि मालिका आल्या. एवढंच नव्हे तर ताराराणी यांच्यावरदेखील मालिका आली, पण अशा पद्धतीने ते दाखवण्यात आलेलं नाही. सुधीर सरांना वेबसीरिजदेखील करायची होती, पण आपण ठरवून काही उपयोग नसतो. चॅनेलनेदेखील ते स्वीकारायला हवं ना, पण नाटक अशी गोष्ट आहे की आपल्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही.