Ajit Pawar : 'रिझल्ट' द्या, मोठी संधी देऊ ; अजित पवार यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शब्द
esakal March 01, 2025 04:45 PM

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची आहे. त्यामुळे कामाला लागण्याचा कानमंत्र पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना दिला. आगामी निवडणुकांत चांगली कामे करून चांगला रिझल्ट देणाऱ्यांना अडीच वर्षांनंतर मोठी संधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथे शुक्रवारी (ता. २८) झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे. त्यासाठी पक्षाचे विचार, तत्त्व आपण आचरणात आणले पाहिजे. हा पक्ष समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा आहे. पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोचवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागा’’ असे पवार म्हणाले.

राज्यातील महायुतीचे सरकार सर्व घटकांना घेऊन काम करत आहे. मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत, असे सांगताना पवार यांनी बाभळीचा प्रकल्प आपण मार्गी लावला आहे, अशी आठवण करून दिली. सरकार विविध योजना राबवत असताना आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा (एआय) वापर करत आहे. नांदेड-जालना महामार्गाच्या कामाला गती दिल्याचे त्यांनी सांिगतले.

अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार

विधिमंडळाचे तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. दहा मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्यातील साडेतेरा कोटी जनतेचे लक्ष लागले आहे. समाजातील शेवटच्या घटकाला डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प तयार होणार आहे. त्यामुळे पुरवणी यादी देणार आहोत. त्यात बऱ्याच बाबी समाविष्ट असतील. ‘लाडकी बहीण’ सारख्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

परभणीत १५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

परभणी : काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील १५ माजी नगरसेवकांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नाजनीन पठाण, विकास लंगोटे, जाकेर लाला, आकाश लहाने, अक्षय देशमुख, शेख अहेमद, कलीम अन्सारी, अली खान, जयश्री खोबे, वसीम कबाडी, मोहमद मेमन, अखिल काजी, कृष्णकांत देशमुख आदी माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.