SA vs ENG : दक्षिण आफ्रिका-इंग्लंड सामना रद्द झाल्यास अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये? जाणून घ्या
GH News March 01, 2025 08:08 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आज (1 मार्च) बी ग्रुपमधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. हा सामना कराचीतील नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत खेळलेल्या 2 पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अजून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली नाहीय. तर सलग 2 पराभवांमुळे इंग्लंडचा या स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इंग्लंडचा विजयाने शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. पावसामुळे तब्बल 3 सामने रद्द करावे लागले. पावसामुळे 2 सामन्यांमध्ये टॉसही होऊ शकला नाही. तर एका सामन्यातील दुसर्‍या डावात पावसाने एन्ट्री घेतल्याने त्या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना रद्द झाला? तर कोणती टीम उपांत्य फेरीत पोहचेल? हे जाणून घेऊयात. बी ग्रुपमधून ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचली आहे. इंग्लंड स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोघांत 1 जागेसाठी चुरस आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी इंग्लंडविरुद्ध विजयी होणं महत्त्वाचं आहे.

पावसामुळे सामना रद्द झाला तर काय?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात कराचीत होत असलेला सामना पावसामुळे रद्द झाल्यास अफगाणिस्तानला सर्वात मोठा झटका लागेल. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 28 फेब्रुवारीला झालेल्या सामन्याचा पावसामुळे निकाल लागू न शकल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 4 गुणासह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तर अफगाणिस्तानचे 3 गुण झाले. अफगाणिस्तानचा नेट रनरेट हा -0.990 असा आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यातही 3 गुण आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा अफगाणिस्तानच्या तुलनेत सरस आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा +2.140 असा आहे.

त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामना पावसामुळे रद्द जरी झाला तरी, दक्षिण आफ्रिका 4 गुणांसह उपांत्य फेरीत सहज प्रवेश मिळवेल.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.