दुबईत भारताविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी दोन टीम जाणार! कारण की…
GH News March 01, 2025 08:08 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. असं असलं तरी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर पाकिस्तान आणि दुबईत खेळवली जात आहे. भारताने पाकिस्तान खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर ही रणनिती अवलंबली गेली आहे. भारताचे सर्व सामने हे दुबईत होत आहेत. तर इतर संघांचे सामने कराची, लाहोर आणि रावलपिंडीत होत आहेत. असं असताना भारताने साखळी फेरीचे दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. उपांत्य फेरीतील भारताचा सामना 4 मार्चला होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार आहे. पण हा सामना कोणासोबत खेळला जाईल हे अद्याप स्पष्ट नाही. उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होऊ शकतो. ईएसपीईएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे दोन्ही संघ दुबईला जाणार आहेत.

आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने ईएसपीईएनक्रिकइंफोला सांगितलं की, ‘दोन्ही संघांना पाठवण्याचं कारण असं की, त्या दोन्ही संघांना तयारी करण्यासाठी अधिकचा वेळ मिळेल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 4 मार्चला होणार आहे. उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं की, पुढच्या दिवशी न्यूझीलंड आणि दुसरी टीम पाकिस्तानात येईल.’

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2 मार्चला सामना होणार आहे. या सामन्यात अ गटातून कोणता संघ टॉपला आणि दुसऱ्या क्रमांकावर राहील हे स्पष्ट होईल. कारण उपांत्य फेरीचं गणित हे ब गटातील टॉपचा संघ अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी खेळेल. तर ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ अ गटातील टॉपच्या संघासोबत खेळेल. त्यामुळे भारत न्यूझीलंड सामन्याच्या निकालाशिवाय हे चित्र स्पष्ट होणार नाही.

उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. 4 मार्चच्या सामन्यासाठी 5 मार्च हा दिवस राखीव आहे. तर 5 मार्चच्या सामन्यासाठी 6 मार्च हा दिवस राखीव आहे. भारताने अंतिम फेरी गाठली तर हा सामना दुबईत 9 मार्चला होईल. या सामन्यासाठी 10 मार्च हा दिवस राखीव ठेवला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.