मेहुणबारे (ता. चाळीसगाव),- गिरणा परिसरात यंदा रब्बी हंगामाला चांगले दिवस आले आहेत. अशा चांगल्या दिवसांतच विजेचा लपंडाव होत असल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना ‘लाइट’साठी संपूर्ण ’नाइट’ करावी लागत आहे.
सततच्या होणाऱ्या या वीज भारनियमनामुळे तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथील संतप्त झालेले शेतकरी आत्मदहनाच्या तयारीने डिझेल घेऊन येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आले होते. कार्यालयातील अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांशी बोलणे करुन दिल्यानंतर शेतकरी माघारी फिरले. मागीलवर्षी चांगला पाऊस झाला असला तरी खरीप हंगामाची जी तूट झाली आहे ती भरून काढण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. तिरपोळे परिसरात चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री शेतीसाठी वीजपुरवठा सुरु असतो. मात्र, तो देखील पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
शेतीपंपांसाठी चार तास वीज दिली जाते व त्यातही मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जाते. त्यामुळे पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस सध्या करीत आहेत. अक्षरशः जीव मुठीत घेऊन शेतकरी अंधाऱ्या रात्रीत पिकांना पाणी देत आहेत.
रात्री तरी पुरवठा करा
महावितरणकडून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. चार तासातील एक किंवा दोन तास भारनियमात जात असल्याने जेमतेम तीन, साडेतीन तास वीज पुरवठा केला जातो. निसर्गाच्या कृपेने यावर्षी पाणी मुबलक आहे. मात्र, महावितरणाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे पाणी असूनही ते देता येत नसल्याचे वास्तव आहे. रात्रीच्या वेळी अंधारात शेतात जाणे जीवावर बेतण्यासारखे आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसह हिंस्त्र प्राण्यांची सतत भीती असते. याच भागात बिबट्याचा वावर असला तरी पिके वाचवण्यासाठी शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जात असतात. त्यामुळे ‘आमची हात जोडून विनंती आहे, की एक वेळ दिवसा वीज नाही तरी चालेल, रात्री तरी सुरळीत वीज द्या’ अशी आर्त विनंती शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या अभियंत्यांकडे डोळ्यांत पाणी आणून केली.
शेतकरी हतबल
शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांनी मागे आलेले संकट यंदाच्या रब्बीतून भरुन निघेल म्हणून रब्बीच्या पेरणीसाठी महागडे बियाणे, रासायनिक खते, मशागत, औषध फवारणी आदींवर मोठा खर्च केलेला आहे. त्यासाठी सहकारी संस्थांसह खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज डोळ्यांसमोर दिसत असल्याने ते फेडण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अशा परिस्थितीत एखाद्या भागात ट्रान्सफार्मर जळाला तर तो लवकर दुरुस्त होत नाही. तालुक्यात विजेचा ज्या प्रकारे लपंडाव सुरु आहे, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.