उष्णतेच्या वाढत्या प्रभावात आहाराची योग्य काळजी घेणे आवश्यक
esakal March 01, 2025 11:45 PM

कच्ची बातमी


उष्णतेच्या वाढत्या प्रभावात आहाराची योग्य काळजी घेणे आवश्यक

सध्या वातावरणातील तापमान झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे शरीरावर विविध परिणाम होत आहेत. वाढत्या उन्हामुळे जास्त तहान लागणे, घाम येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे असे बदल जाणवतात. अशा परिस्थितीत आहारात योग्य बदल केल्यास वाढत्या उष्णतेचा त्रास टाळता येतो.

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी सर्वांत महत्त्वाचे

उन्हाळ्यात शरीरातील पाणी आणि आवश्यक पोषणतत्त्वे घामावाटे बाहेर पडतात, त्यामुळे निर्जलीकरण (Dehydration) होण्याची शक्यता वाढते. यामुळे थकवा, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्याचा धोका असतो. यासाठी दिवसभरात नियमितपणे पाणी पिणे आवश्यक आहे.

हायड्रेशनसाठी उपयुक्त पेये:
• पाणी
• ताक
• लिंबूपाणी
• नारळपाणी
• कोकम सरबत
• बेलफळाचे सरबत

या नैसर्गिक पेयांमुळे शरीराची जलपातळी संतुलित राहते आणि उष्णतेचा दुष्परिणाम कमी होतो. विशेषतः पाण्यात वाळा टाकल्यास त्याचे थंड गुणधर्म शरीराला अधिक फायदेशीर ठरतात.

बाटलीबंद शीतपेयांचा आणि थंड पदार्थांचा टाळावा वापर

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेक जण बाटलीबंद शीतपेये किंवा बर्फाचे पदार्थ सेवन करतात. मात्र, यामध्ये असणारी अतिरिक्त साखर, अनैसर्गिक रंग आणि रसायने शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. फ्रिजमधील थंड पाण्याऐवजी माठातील थंड पाणी आरोग्यास अधिक फायदेशीर ठरते.

पचनास हलका आहार असावा

उन्हाळ्यात पचनसंस्था जड पदार्थ पचवण्याइतकी कार्यक्षम नसते. त्यामुळे तळलेले, मसालेदार आणि गव्हाचे मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळावेत. याऐवजी ताज्या, सकस आणि पचनास हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

उन्हाळ्यासाठी उपयुक्त आहार:
• ऋतूनुसार मिळणारी फळे – द्राक्ष, कलिंगड, खरबूज, ताडगोळे, काकडी
• सूप, मठ्ठा, सोलकढी, अंबील यांसारखी तरल पदार्थयुक्त खाद्यपदार्थ

टाळावयाचे पदार्थ:
• चहा, कॉफी
• फळांचे तयार रस
• बाटलीबंद शीतपेय
• आईस्क्रीम आणि बर्फाचे पदार्थ
• फ्रिजमधील थंड पाणी

निष्कर्ष

उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे आणि योग्य प्रमाणात द्रव मिळाला तर उष्णतेचा दुष्परिणाम टाळता येतो. त्यामुळे हलका, ताजा आणि पचनास सुलभ आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे हीच उष्णतेवरची सर्वात प्रभावी उपाययोजना आहे.

- प्रिया गुरव, आहारतज्ञ
अरोग्य सेवा ठाणे मंडळ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.