Ranji Trophy Final: विदर्भाची तिसऱ्या विजेतेपदाकडे आगेकूच; शेवटच्या दिवशी ड्रॉ झाला, तरी जिंकणार ट्रॉफी
esakal March 02, 2025 03:45 AM

Ranji Trophy 2024-25, VID vs KER: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा अंतिम सामना नागपूरमध्ये विदर्भ विरुद्ध केरळ संघात खेळला जात आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या सामन्यात दोन्ही संघात रोमांचक लढत पाहायला मिळाली आहे. अ

से असले तरी विदर्भाने चौथ्या दिवस अखेर वर्चस्व राखण्यात यश मिळवलं असून त्यांनी आता तिसऱ्या विजेतेपदाकडे आगेकूच केली आहे.

चौथ्या दिवसाचा (शनिवार, १ मार्च) खेळ संपला, तेव्हा विदर्भाच्या दुसऱ्या डावात ९० षटकात २४९ धावा झाल्या होत्या. तसेच त्यांनी पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी घेतलेली असल्याने विदर्भाकडे एकूण २८६ धावांची आघाडी आहे.

चौथ्या दिवस अखेर अनुभवी करूण नायर २८० चेंडूत १३२ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याच्यासोबत विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर ४ धावांवर नाबाद आहे. आता हे दोघे पाचव्या दिवसाची सुरुवात करतील.

त्यामुळे पाचव्या दिवशी किती धावा करून केरळ समोर विजयाचे लक्ष्य ठेवणार हे पाहावे लागणार आहे. केरळला आता जर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर नाव कोरायचे असल्यास त्यांना विदर्भाला पाचव्या दिवशी लवकर सर्वबाद करून त्यांनी दिलेलं लक्ष्य यशस्वी पार करावे लागेल.

जर हा सामना विदर्भाने जिंकला किंवा हा सामना दिवस संपेपर्यंत पूर्ण झाला नाही आणि अनिर्णित राहिला, तरी विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरेल. कारण सामना जर अनिर्णित राहिला, तर नियमानुसार पहिल्या डावात विदर्भाने आघाडी घेतली असल्याने त्यांना २०२४-२५ हंगामाचे विजेते घोषित केले जाईल.

या सामन्यात चौथ्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण पार्थ रेखाडे (१) आणि ध्रुव शोरे (५) हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. पण दानिश मालेवार आणि करुण नायर पुन्हा विदर्भाच्या मदतीला धावले. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १८२ धावांची भागीदारी केली.

करुणने २०२४-२५ हंगामातील नववे शतक झळकावले. पण त्याच्या शतकानंतर दानिश ७३ धावांवर माघारी परतला. त्यापाठोपाठ काही वेळ करुणला साथ देऊन यश राठोडही २४ धावांवर बाद झाला. पण करुणने डाव पुढे चालू ठेवला. दिवसाखेर त्याला अक्षय वाडकर साथ देत होता.

केरळकडून चौथ्या दिवस अखेर एमडी निधीश, जलज सक्सेना, आदित्य सरवटे आणि अक्षय चंद्रन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना १२३.१ षटकात सर्वबाद ३७९ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून दानिश मालेवारने १५३ धावांची, तर करूण नायरने ८६ धावांची खेळी केली होती.

केरळकडून गोलंदाजी करताना एमडी निधीश आणि एडेन ऍपल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर केरळला पहिल्या डावात १२५ षटकात सर्वबाद ३४२ धावा करता आल्या. केरळकडून कर्णधार सचिन बेबीने ९८ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. तसेच आदित्य सरवटेने ७९ धावा केल्या.

विदर्भाकडून दर्शन नळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत सांघिक कामगिरी बजावली. दरम्यान, केरळचा पहिला डाव ३४२ धावांवर संपल्याने विदर्भाला ३७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.