भारतीय संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी दुबईमध्ये आहे. भारताने रविवारी दुबईत न्यूझीलंड संघाला ४४ धावांनी पराभूतही केले. मात्र, या सामन्याच्या आधी भारतीय संघाच्या एका सदस्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय संघाचे मॅनेजर आर देवराज यांच्या आईचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यामुळे ते त्वरित दुबईहून भारतात परतले आहेत.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार निधन वार्ता समजताच आर देवराज हे या दु:खाच्या समयी कुटुंबासमवेत राहण्यासाठी दुबईहून हैदराबादला रवाना झाले. आर देवराज हे सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव देखील आहेत.
दरम्यान, भारताला आता ४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामना खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवला, तर भारतीय संघ ९ मार्च रोजी अंतिम सामना खेळेल.
जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला, तर भारताचे आव्हान संपेल. त्यामुळे आता देवराज पुन्हा भारतीय संघाशी कधी जोडले जाणार आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही. कदाचित उपांत्य सामन्यानंतर याबाबत निर्णय ते घेण्याची शक्यता आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे शोक व्यक्त केला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की 'अत्यंत दु:खाने आम्ही कळवत आहोत की आमचे सचिव देवराज यांच्या मातोश्री, कमलेश्वरी गरु, यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आमच्या संवेदना देवराज गरु आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.'
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजितभारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानला पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
उपांत्य फेरीत भारतासह न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ पोहचले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्यानंतर ५ मार्च रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात उपांत्य सामना होईल.