टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना हा 4 मार्चला खेळवण्यात येणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत सुस्साट आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सलग 3 सामने जिंकले आहेत. तर त्याआधी मायदेशात इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. टीम इंडियाने अशाप्रकारे सलग 6 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला रोहितसेनेकडे कांगारुंचा धुव्वा उडवत वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. कांगारुंनी टीम इंडियाला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पराभूत करत वर्ल्ड कप जिंकण्यापासून रोखलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
टीम इंडियासमोर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याला रोखण्याचं सर्वातं मोठं आव्हान असणार आहे. याच हेडने वनडे वर्ल्ड कप 23 फायनलमध्ये शतकी खेळी करत टीम इंडियाकडून वर्ल्ड कप हिसकावला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतही हेडने खेळी केली होती. मात्र हेडला योग्य वेळेस टीम इंडियाने रोखलं होतं. त्यामुळे आता उपांत्य फेरीत या हेडला लवकरात लवकर आऊट करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. आता हेडला मैदानाबाहेरचा रस्ता कोण दाखवणार? याकडे लक्ष असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन अॅबॉट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा आणि अॅडम झॅम्पा.