आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत मंगळवारी 4 मार्च रोजी उपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. टीम इंडियाची या सामन्याच्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून वाईट बातमी समोर आली आहे. माजी दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. मुंबईकर आणि माजी फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची अनेक दिवस मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर ही झुंज अपयशी ठरली आणि पद्माकर शिवलकर यांनी जगाचा निरोप घेतला. पद्माकर शिवलकर हे 84 वर्षांचे होते.
पद्माकर शिवलकर यांनी 2 दशकं मुंबई क्रिकेटची सेवा केली. पद्माकर शिवलकर यांनी 20 वर्ष मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. शिवलकर यांनी या दरम्यान अनेक विक्रम केले. मात्र त्यानंतरही त्यांना भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. बिशन सिंह बेदी हे शिवलकर यांना समकालिन होते. तसेच बिशन सिंह बेदी हे तेव्हा भारतीय संघातील प्रमुख फिरकीपटूपैकी एक असल्याने शिवलकर यांना संधी मिळाली नाही, असं म्हटलं जातं.
पद्माकर शिवलकर यांनी वयाच्या 21 वर्षी 1961/62 या हंगमातून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तर शिवलकर 1987/88 या हंगामापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. शिवलकर यांनी या दरम्यान 124 सामने खेळले. त्यांनी या 124 सामन्यांमध्ये 589 विकेट्स घेतल्या. तसेच 42 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच 13 वेळा एकाच सामन्यात 10 विकेट्सही घेतल्या. शिवलकर यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 1972/73 या हंगमातील अंतिम सामन्यात तामिळनाडूविरुद्ध एकूण 13 विकेट्स घेतल्या. मुंबईने यासह सलग 15 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश मिळवलं होतं.
पद्माकर शिवलकर यांचं निधन
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी पद्माकर शिवलकर यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला. तसेच पद्माकर शिवलकर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पद्माकर शिवलकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट वर्तुळाचं मोठं नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे.