वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत गुजरात जायंट्सने आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. या स्पर्धेच्या 15व्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि ट्रेंडप्रमाणे प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण जातं याचा अंदाज गुजरातला होता. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचा हेतू मनात ठेवून संघ मैदानात उतरला होता. बेथ मूनीने युपीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दयालन हेमलथा स्वस्तात बाद झाली. पण बेथ मूनीने हरलीन देओलसह दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. बेथ मूनीने 59 चेंडूत 17 चौकारांच्या मदतीने नाबाद 96 धावा केल्या. तिचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. नाही तर या स्पर्धेतील पहिलं शतक तिच्या नावावर असतं. गुजरात जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही युपी वॉरियर्सला काही गाठता आलं नाही.
युपी वॉरियर्सचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. ग्रेस हॅरिसने त्यातल्या 25 धावा केल्या. पण इतर फलंदाज मात्र हजेरी लावून गेले. किरण नवगिरेने 0, जॉर्जिया वोलने 0, वृंदा दिनेश 1, दीप्ती शर्मा 6, श्वेता सेहरावत 5, उमा छेत्री 17, चिनेले हेन्री 28, सोफिया एक्सलस्टोन 14, गौहर सुल्ताना 0 अशा विकेट गेल्या. युपी वॉरियर्स 17.1 षटकात 105 धावा करून सर्व गडी गमावले. यासह गुजरात जायंट्सने युपी वॉरियर्सवर 81 धावांनी विजय मिळवला.
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, दीप्ती शर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, उमा चेट्री (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, गौहर सुलताना.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), फोबी लिचफील्ड, डिआंड्रा डॉटिन, काशवी गौतम, भारती फुलमाली, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा.