टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( ) याच्या शरीरयष्टीवरून यापूर्वीही अनेकदा चर्चा झाल्या आहेत. पण, या चर्चा सोशल मीडियावर रिकामटेकड्यांकडून होत होत्या. मात्र, यावेळी काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद ( shama-mohamed ) यांच्याकडून रोहितच्या जाडपणावर ट्विट केले गेले आणि वाद पेटला. काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे काही नेते मैदानावर उतरेल आणि रोहितच्या बचाव करण्याच्या आडून काँग्रेसला धारेवर धरण्याचं काम सुरू झालं. आता यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( BCC) प्रतिक्रिया दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडिया चांगली कामगिरी करतेय आणि अशा विधानाने संघाचे खच्चीकरण होऊ शकते, असे मत बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकीया यांनी व्यक्त केले.
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी न्यूझीलंडवर विजय मिळवून अ गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत जागा पक्की केली. उपांत्य फेरीत भारतासमोर तगड्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर काँग्रेस प्रवक्त्या यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करताना त्याला 'जाडा'म्हटले. शिवाय कर्णधार म्हणूनही रोहित अपयशी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या विधानाचा भाजपाकडून समाचार घेतला गेला. राहुल गांधींचा स्ट्राईक रेट पाहा, ९० निवडणुका ते हरले आहेत, अशा शब्दात टीका केली गेली. भाजपाचे प्रवक्ता शहजाद यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, 'काँग्रेस भारताचा विरोध करता करता आता भारतीय देशाविरोधातही होत आहे. रोहितवर टीका करून त्यांनी बॉडी शेमींग विधान केलं आहे. भारताच्या यशासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा त्यांना राग आहे.'
दरम्यान, शमा यांनी ANI शी बोलताना स्वतःच्या विधानाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या,"हे एका खेळाडूच्या फिटनेसबद्दलचे ट्विट होते. ते बॉडीशेमिंग नव्हते. रोहित थोडा जास्त जाड आहे, म्हणून मी त्याबद्दल ट्विट केले. माझ्यावर विनाकारण हल्ला केला जातोय. जेव्हा मी त्याची तुलना मागील कर्णधारांशी केली तेव्हा मी एक विधान केले. मला अधिकार आहे. असे म्हणण्यात काय चूक आहे? ही लोकशाही आहे."
बीसीसीआय काय म्हणतेय...बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत केलेल्या वादग्रस्त टिपणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या वक्तव्याला "अत्यंत दुर्दैवी" म्हणत असा टीकेचा सूर संघाच्या मनोधैर्यावर परिणाम करू शकतो, असे स्पष्ट केले.
"संघ एका महत्त्वाच्या स्पर्धेत खेळत आहे. अशा विधानांचा खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो," असे सैकिया यांनी NDTV ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले.राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.