Ambernath News : कोल्डड्रिंकच्या बाटलीत आढळला काचेचा तुकडा, मनपा अधिकाऱ्यांना कारखान्याला ठोकलं टाळं, अंबरनाथमधील घटना
esakal March 04, 2025 02:45 AM

श्रीकांत खाडे, अंबरनाथ

Glass Piece Found in Cold Drink Bottle : कोल्डड्रिंक बाटलीत काचेचा तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीला आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली असून संबंधीत कारखानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली आहे. संबंधित कारखान्यात नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी धाव घेत कोल्डड्रिंकचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत उत्पादन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

अंबरनाथ पश्चिम येथील वुलन चाळ परिसरातील एका कारखान्यात कोल्डड्रिंक तयार करून ते शहरात विविध ठिकाणी विकण्यासाठी पुरविण्यात येते. बदलापूर येथे राहणारे किरण भगत यांनी त्यांच्या मुलांसाठी एका हातगाडीवरून कोल्ड्रिंक्स विकत घेतले. त्यावेळी भगत यांना कोल्ड्रिंक्सच्या बाटलीत काचेचा तुकडा आढळून आला. याबाबत भगत यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांना माहिती दिली. 

शैलेश शिर्के यांनी मनसे पदाधिकारी आणि अंबरनाथ पालिका प्रशासनाचे अधिकारी विनीत पाटोळे पदाधिकाऱ्यांसह कोल्डड्रिंक तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक दिली. यावेळी कारखाण्यात असलेल्या एका बाटलीमध्येदेखील त्यांना कचरा असल्याचे दिसून आले. तसेच अनेक जुन्या बाटल्यादेखील त्यांना दुकानात आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित कारखान्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली.

संबंधित कारखान्यात पाहणी केली असता जुना माल दुकानात आढळून आला तसेच कोणत्याही प्रकारची स्वच्छता याठिकाणी नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी कोल्डड्रिंकचे नमुने ठाणे येथील अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विनीत पाटोळे यांनी दिली. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.