फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा
पाच जणांना अटक; चुनाभट्टी पोलिसांची कारवाई
चेंबूर, ता. ३ (बातमीदार) ः फोरेक्स ट्रेडिंग करून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकून पाच जणांना चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे.
सोहेल रफिक सोळंखी (२९), युसुफ युनुस खान (२०), अरबाज शाहिद शेख (२२), गौसिया इस्थेखात शेख (२२), गौरी प्रमोद कांबळे (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा असल्याचे भासवून ग्राहकांना फॉरेक्स ट्रेडिंगसाठी प्रवृत्त करणारे कॉल सेंटर चुनाभट्टी पोलिस ठाणे हद्दीमध्ये सुरू असल्याची गोपनीय माहिती चुनाभट्टी पोलिसांना मिळाली होती. गुप्त बातमीदारांकडून माहिती घेऊन चुनाभट्टीतील जोगानी इंडस्ट्रीमधील गाळा क्र. ४०९, बिल्डिंग क्रमांक आठमध्ये पोलिस पथकाने छापा टाकला असता एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी कित्येक दिवसांपासून ग्राहकांना खोट्या नावाने कॉलिंग करून फसवणूक करीत होते. कॉल सेंटरमधून एकूण सहा संगणक, सहा लॅपटॉप, २७ मोबाईल हँडसेट, २३ विविध कंपन्यांचे सीम कार्ड, ग्राहकांना कॉलिंग करताना मार्गदर्शन करणाऱ्या सूचना लिहिलेल्या वह्या जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत चुनाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोहल रफिक सोळंखी हा नेरूळ येथील व इतर मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहपोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.