पिंपरी, ता. ३ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सदनिका हव्या की नको, यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार २९४ जणांनी ‘सदनिका नको’ असे कळवले आहे. एकाच कुटुंबातील अनेकांनी अर्ज केलेले अथवा ‘म्हाडा’साठी अर्ज दाखल केला असल्यास ‘पीएमआरडीए’चे अर्ज माघार घेण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले आहे. उर्वरित अर्जदारांना ४५ दिवसांत रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३ हजार २७१ जणांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३ हजार २५६ अंतिमतः पात्र झाले. उर्वरित १५ लाभार्थी अपात्र ठरले होते. पात्र अर्जदारांसाठी सदनिकाची सोडत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन काढण्यात आली होती.
चौकट :
१० टक्के रक्कम भरणाऱ्यांना बँकेची ‘एनओसी’
सदनिकांसाठी २६ फेब्रुवारीपासून ४५ दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे. जे लाभार्थी १० टक्के रक्कम भरतील त्यांना ‘पीएमआरडीए’ प्रशासन बँकेसाठी आवश्यक ना हरकत दाखला (एनओसी) देणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना बँकेतील कर्ज प्रक्रिया करण्यास सुलभ होईल, असे प्रशासनाने नमूद केले आहे.