मुंबई विद्यापीठ संघातील खेळाडूंचा सत्कार
संघात एसएसटी महाविद्यालयाच्या १५ जणांचा समावेश
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे झालेल्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरी करत उत्तम यश संपादन केले. त्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यापीठात संघाचा सत्कार करण्यात आला. या संघात एसएसटी महाविद्यालयाच्या १५ खेळाडूंचा समावेश होता.
मुलींच्या खो-खो संघात मीना कांबळे, कल्याणी कंक, किशोरी मोकाशी, रोशनी जुनघरे, दिव्या गायकवाड, काजल शेख, तर मुलांच्या खो-खो संघात वैभव मोरे, अभय रत्नाकर, मयुरेश मोरे, निखिल कदम, संदेश सपकाळ यांचा, तर कबड्डीमध्ये चिन्मय गुरव तसेच ॲथलेटिक्स प्रकारात निकिता मरले, रोहन चौधरी आणि बुद्धिबळसाठी अनिकेत पोटावाड या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यात बुद्धिबळमध्ये अनिकेत पोटावाडने सुवर्णपदकाची कमाई केली, तर मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मुलांच्या खो-खो संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
कबड्डीत मुलांच्या संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले, तसेच ॲथलेटिक्स मुले आणि मुलींच्या संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स संघाचे कोच म्हणून एसएसटी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. राहुल अकुल यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी तसेच एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांच्यासह महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी यांनी सर्व शिक्षक, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.