उन्हाळ्यात टायर टिकण्यासाठी 'नायट्रोजन' उत्तम
esakal March 04, 2025 02:45 AM

पिंपरी, ता. ३ : आपल्या वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरायची की साधी? हा प्रश्न सर्वच वाहनचालकांच्या पडतो. पण, टायरमध्ये ‘नायट्रोजन’ हवा भरली तर त्याचे अनेक फायदे असल्याचे वाहतूक अभ्यासकांनी सांगितले.
नागरिक लांब पल्याच्या प्रवासात बऱ्याचवेळा वाहन कुठेही न थांबवता ३०० ते ३५० किमी सलग प्रवास करतात. उन्हाळ्यात जास्त प्रवास केल्यामुळे वाहनांचे टायर गरम होतात. यावेळी साधी हवा गरम झाल्यामुळे अधिक प्रसरण पावते. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याचा धोका असतो. असे प्रसंग टाळण्यासाठी टायरमध्ये नायट्रोजन हवा भरणे योग्य मानले जाते. सामान्य हवेपेक्षा ते जास्त फायदेशीर असते.

साधी हवा
फायदे : नायट्रोजन हवेच्या तुलनेत स्वस्त आहे. गावखेड्यातही हवा भरणे सोयीस्कर आहे.
तोटे : टायरमध्ये भरल्या जाणाऱ्या साध्या हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. ऑक्सिजनमुळे टायरच्या डिस्कवर ओलावा निर्माण होतो. त्यामुळे डिस्क गंजून लवकर खराब होते. तसेच उन्हाळ्यात टायर लवकर गरम होतो. टायरवर दाब वाढल्यावर हवा गळतीची समस्या अधिक असते.

नायट्रोजन
फायदे : टायरमध्ये हवा गळतीची प्रमाण कमी असते. टायरमध्ये योग्य प्रमाणात दाब असल्यास कार आणि बाईकचे मायलेज वाढते. उन्हाळ्यात टायर थंड ठेवण्यास मदत करतो. टायरचे आयुष्यही वाढते.
तोटे : साध्या हवेच्या तुलनेत जास्त पैसे मोजावे लागतात.
---------
वाहनांच्या चाकामध्ये नायट्रोजन हवा भरल्यास चाक गरम होण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अपघाताचा धोका कमी असतो. नागरिकांमध्ये आता रस्ते सुरक्षेबाबात जागृती होत असून नागरिक सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत आहे. वाहनांचे अपघात रोखण्यासाठी नायट्रोजन हवादेखील उपयुक्त ठरते.
- संजय ससाणे, माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

नायट्रोजन हवा भरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनचालक नायट्रोजन हवा भरण्याला प्राधान्य देतात.
- अतिक यादव, टायर व्यावसायिक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.