रस्त्यावर पान खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे बोर्ड अनेक ठिकाणी लावलेले दिसतात. इमारतींमध्येही येथे थुंकू नये असं जिन्यांमध्ये, भिंतीवर लिहिलेलं असतं. आता उत्तर प्रदेशात विधानसभेतच आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याची घटना समोर आलीय. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी याबाबत विधानसभेत सर्व आमदारांना याबाबत इशारा दिलाय. यापुढे असं करू नका, इतर सहकारी असं वागताना दिसले तर त्यांना थांबवा असंही अध्यक्षांनी सांगितलंय.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, विधानसभेच्या हॉलमध्ये एका आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारली होती. मी ते स्वच्छ करून घेतलंय. व्हिडीओमध्ये मी त्या आमदाराला पाहिलंय पण व्यक्तिगतरित्या कोणाला अपमानित करायचं नाहीय. त्यामुळे नाव घेत नाही. आता सर्व सदस्यांना विनंती आहे की सहकारी असं वागताना दिसले तर त्यांना थांबवा.
विधानसभा ही सर्वांची ४०३ जणांची आहे, एकट्या अध्यक्षांची नाही. ही स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. मी कोणाचं नाव घेणार नाही. त्यांनी स्वत: येऊन सांगावं. ते स्वत: आले तर ठीक नाहीतर मी बोलावून घेईन असंही विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी म्हटलं.
उत्तर प्रदेशची विधानसभा ही राज्यातील २५ कोटी नागरिकांच्या सन्मान आणि आस्थेचं प्रतिक आहे. याची स्वच्छता ठेवणं आणि मर्यादा कायम ठेवणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे इथून पुढे असं काही होणार नाही याची काळजी घ्या असंही महाना म्हणाले.
उत्तर प्रदेश विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सोमवारी सभागृहात गदारोळ झाला होता. सपा सदस्यांनी विद्यापीठांमध्ये कार्यपरिषदेची निवडणूक न झाल्यानं निषेध नोंदवत सभागृहातून वॉक आऊट केलं होतं.