MLA Amol Patil : माती-पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी यात्रा उपयुक्त
esakal March 04, 2025 08:45 PM

पारोळा- गावोगावी मृद व जलसंधारणाचे महत्त्व ही रथयात्रा भावी पिढीसह नागरिकांना पटवून देईल. माती व पाणी येणाऱ्या पिढींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यात्रेच्या माध्यमातून त्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.

राज्याला दुष्काळ व टँकरमुक्त करण्यासाठी केंद्रासह राज्याचा देखील कार्यक्रम राबविला जात आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोनअंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट रथयात्रेचा तालुक्यातील वाघरे या गावात रविवारी (ता.२ आमदार पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी वाघरे या गावाचे सरपंच रावसाहेब पाटील, माजी सरपंच बापू पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य रोहित पाटील,जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळकृष्ण शंकरराव ढंगारे, वनपरिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले, तहसिलदार अनिल पाटील, जिल्हा उपविभागीय जलसंधारण अधिकारी राहुल मिटकरी, इंदूताई पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांचच्यासह वाघरे येथील ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, पोलिस पाटील, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, मृद व जलसंधारण विभाग व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पन्नास दिवस जनजागृती करणार!

या समारंभात मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक या योजनेच्या राज्यातील १४० प्रकल्प क्षेत्रातील ३० जिल्ह्यांतील ९७ तालुके व ३६० गावांतून पाणलोट रथ ५० दिवस जनजागृतीचे काम करणार आहे. शेती क्षेत्रात नवनवीन उपक्रम, संकल्पना राबवून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असलेल्या शेतकरी बांधवांचा व बचत गटातर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माता-भगिनींचा यावेळी आमदार अमोल पाटील, तहसीलदार अनिल पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.