दाभिळ सरमळे येथे सातबांव हे धार्मिक ठिकाण आहे. नदीमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली सात विवरे असून ती पाण्याने पूर्ण भरलेली असतात. याची खोली साधारण २० फुटांपर्यत आहे.
सावंतवाडीः तालुक्यातील दाभील सरमळे गावाच्या सीमेवरील दाट जंगल असलेल्या सातबांव या ठिकाणी नदीत असलेल्या देवकुंडात (नैसर्गिक विहीर) पट्टेरी वाघिणीचा सडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे आणि त्यांचे मित्र सचिन घाडी या भागात गेले असता काल (ता. २) उशिरा हा प्रकार उघड झाला. त्यांनी आज याबाबत वनविभागाला कल्पना दिल्यानंतर वनविभागाचे (Forest Department) उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व पथकाने पंचनामा करून मृत वाघिणीला बाहेर काढले. जवळपास आठवड्यापूर्वी या ती विहिरीत पडून मृत झाली असावी, असा अंदाज पशुवैद्यकीय पथकाने व्यक्त केला.
दाभिळ सरमळे येथे सातबांव हे धार्मिक ठिकाण आहे. नदीमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली सात विवरे असून ती पाण्याने पूर्ण भरलेली असतात. याची खोली साधारण २० फुटांपर्यत आहे. यातील एका विवरात ही वाघीण मृतावस्थेत दिसली. हा भाग जंगलमय असल्याने सहसा माणसांचा नियमित राबता नसतो. याच परिसरात निसर्ग भ्रमंतीसाठी रानमाणूस म्हणून प्रसिद्ध प्रसाद गावडे व त्यांचा मित्र सचिन घाडी रविवारी गेले होते त्या भागात असलेल्या नदीमध्ये विसरीसारख्या पाण्याने भरलेल्या विवरामध्ये पट्टेरी वाघ सडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.
उपवनसंरक्षक सिंधुदुर्ग नवकिशोर रेड्डी सहउपवनसंरक्षक वैभव बोराटे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील आदी वनविभगाचे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता शिकारीच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचे काहीच आढळले नाही. विवरात उतरल्यावर वाघिणीने बाहेर येण्यासाठी केलेली धडपड आणि विवराच्या खडकावर तिच्या नखाचे उमटलेले खुणा आढळल्या. शिवाय मृत वाघिणीच्या पंज्याची नखे व दात अस्तित्वात होती. त्यामुळे हा घातपात किंवा शिकारीच्या उद्देशाने केलेला प्रकार नसल्याच्या अंदाज उपवनसंरक्षक रेड्डी व पथकाने व्यक्त केला. भक्ष्याच्या पाठलाग करत असताना ती पडल्याने हा प्रकार घडला असावा, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, डॉ. विठ्ठल कराळे व डॉ. मृणाल वरथी यांना पाचारण केले. तत्पूर्वी वनमजूर व कृती दलाच्या टीमकडून त्या वाघिणीला विवरातून बाहेर काढले. विच्छेदन केल्यानंतर त्यांच्या अंदाजानुसार साधारण आठवड्याभरापूर्वी वाघिणीचा बुडून मृत्यू झाला असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. वनविभागाने पंचनामा करून त्याच ठिकाणी तिला जाळून सोपस्कार पूर्ण केले.
वनशक्ती संस्थेने आंबोली ते मांगेली हा व्याघ्र कॉरिडॉर संरक्षित व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करत लढा दिला होता. याच लढ्याच्या अनुषंगाने सह्याद्रीच्या रांगातील २५ गावे इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केली आहेत. याच भागात अलीकडेच वन विभागाने आठ वाघांची नोंद अधिकृतरित्या जाहीर केल्याने वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी समृद्ध जैवविविधतेला मिळालेले प्रमाणपत्र असून वन विभागाने ही वनसंपत्ती जपण्यासाठी मोठे पाऊल उचलावे, असेही म्हटले होते. मात्र, वाघिणीचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
देवकुंडात अन्नसाखळीतील सगळ्यात वरच्या स्तरातील वाघाचा मृत्यू होणे हे बरेच काही सांगून जाणारे आहे. निसर्गाचे संवर्धन आणि अन्नसाखळी कमजोर होण्यापासून रोखण्याचे संकेत यातून मिळत आहेत. ही पर्यावरणाच्या दृष्टीने खूप मोठी घटना आहे. या भागातील पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे.
- प्रसाद गावडे, पर्यावरण अभ्यासक
आठ वाघांच्या नोंदीपैकी एकसावंतवाडी ते दोडामार्ग या पट्ट्यामध्ये तब्बल आठ वाघांची नोंद झाली आहे. यामध्ये पाच मादी तर तीन नर आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने वाघांची नोंद वनविभागाने अधिकृतरित्या समोर आणली होती. याच आठ वाघांच्या नोंदी पैकी मृत झालेली ही वाघिणी असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन विभागाने वाघाच्या या कॉरिडॉरमध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने अधिकाधिक पावले उचलणे गरजेचे आहे. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपक्रम आखणे गरजेचे असल्याचे आता या घटनेच्या माध्यमातून पुढे येत आहे.