पुणे - कात्रज परिसरातील इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या भूषण एंटरप्रायझेस कंपनीत लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक दुचाकी आणि वाहनांचे सुटे भाग जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाले नाही.
कात्रज- गुजरवाडी रस्त्यावर साई इंडस्ट्रिअल भागात इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी भूषण एंटरप्रायझेस ही कंपनी आहे. मंगळवारी दुपारी या कंपनीच्या आवारातील दुचाकींना अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगार सुरक्षित बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कंपनीत दोन हजार इलेक्ट्रिक दुचाकी बनविण्याचे सुटे भाग होते.
या कंपनीतील साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आकाशात धुराचे लोट पसरले होते. या आगीत अर्धवट बनविलेल्या स्थितीत असलेल्या दीडशेहून अधिक दुचाकी, वाहनांचे सुटे भाग, बॅटरी आणि इतर साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गंगाधाम, कात्रज, कोंढवा बुद्रूक आणि पीएमआरडीए केंद्रातील सहा बंब आणि १३ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. कात्रज केंद्रातील अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्यासह इतर जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, असे मुख्य नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.