पतपेढीच्या पैशांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अंधेरी, ता. ४ (बातमीदार) ः कांदिवलीतील एका खासगी पतपेढीच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत गायकवाड आणि प्रवीण चौरसिया अशी या दोघांची नावे असून, यातील प्रशांत हा पतपेढीचा क्लार्क तर प्रवीण हा कलेक्शन एजंट म्हणून कामाला आहे.
या दोघांनी खातेदारांकडून घेतलेल्या सुमारे १८ लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. ६३ वर्षांचे तक्रारदार कांदिवली परिसरात राहतात. इराणीवाडीतील एका खासगी पतपेढीत ते अध्यक्ष म्हणून कामाला आहेत. तिथेच प्रशांत क्लार्क, तर प्रवीण कलेक्शन एजंट म्हणून काम करत होता. प्रवीणवर खातेदारांकडून पैसे जमा करून पतपेढीत जमा करणे, त्यांची पासबुकमध्ये नोंद करून खातेदारांना देणे आदी जबाबदारी होती. गेल्या दोन वर्षांत त्याने खातेदारांकडून काही रक्कम घेतली होती, मात्र ही रक्कम पतपेढीत जमा केली नाही. हा प्रकार उघडकीस येताच पतपेढीच्या संचालक मंडळांनी त्याची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत प्रवीणने जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत ११० खातेदारांकडून १८ लाख ७१ हजार रुपये कलेक्शनची रक्कम जमा केली होती, मात्र ही रक्कम पतपेढीत जमा केली नाही.
प्रशांतच्या मदतीने त्याने संगणकीय लेझर बुकमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केले होते. हा प्रकार उघडकीस येताच अध्यक्षांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रवीण चौरसिया आणि प्रशांत गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू असून, दोन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.