प्रत्येक समाजाने वधू-वर परिचय मेळावे घ्यावेत
esakal March 05, 2025 12:45 AM

वधू-वर परिचर मेळाव्यांसाठी पुढाकार घ्या
निळकंठ बगळे ः लांज्यात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ४ ः प्रत्येक समाजातील मुलामुलींचा विवाह जुळण्यात मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे उपवर मुलामुलींसह त्यांच्या पालकांनी आत्मचिंतन करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक समाजातून असे वधू-वर परिचय मेळावे झाले पाहिजेत. त्यासाठी मंडळं, संस्था यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा येथे केले.
तालुका बौद्धजन संघ यांच्यावतीने शहरातील कुळकर्णी-काळे छात्रालयात आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी जे. पी. जाधव, संघाचे अध्यक्ष संतोष पडवणकर, सुधाकर कांबळे आदी उपस्थित होते. बगळे म्हणाले, समाजात अनेक मुले-मुली चांगले शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. बंगला, गाडी, पैसा सर्व आहे; मात्र आजच्या तरुण-तरुणींमध्ये अटीशर्थी, अपेक्षा भरमसाठ केल्या जात असल्याने कालांतराने विवाहयोग्य वय निघून जाते व पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे आजच्या तरुण-तरुणींनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यास विवाहाची जटील समस्या निर्माण होणार नाही.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.