मुंबई - बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येची गंभीर घटना लक्षात घेता नैतिकतेचा आदर्श मापदंड उभा करत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, असा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कित्येक दिवस आधी दिला होता.
मात्र त्या संदर्भात कोणतीही हालचाल न झाल्याने अखेर काल (ता. ३) झालेल्या बैठकीत राज्यपालांकडे त्यांच्याविरुद्ध बडतर्फीची शिफारस करावी लागेल, असे शब्द वापरले गेल्याने अखेर आज मुंडेंचा राजीनामा सादर झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक हेडमास्तराची भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेत गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आपल्या सर्व सहकारी मंत्र्यांना तसेच मित्र पक्षांना दिला असल्याचे मानले जात आहे. मुंडे यांनी सोमवारी (ता.३) १५ मिनिटे चाललेल्या बैठकीत स्वत:बद्दल काही रदबदली करण्याचा प्रयत्नही केला.
मात्र फडणवीस यांनी यासंदर्भात आता काहीही नाही शक्य नाही. राजीनामा द्यायचाच नसेल तर मी राज्यपालांकडे बडतर्फीची शिफारस करतो, असे वक्तव्य केले असल्याचे सांगण्यात येते. मात्र मुंडे यांनी आपण वैद्यकीय कारणाने राजीनामा दिल्याचे सांगत स्वतःचा पीळ अजूनही कायम ठेवला आहे.
गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या या प्रकरणाची धग लक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बडगा हाती घेत मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे फडणवीस यांनी सुचवले होते. यासंदर्भात त्वरित हालचाल न झाल्याने फडणवीस यांनी जाहीररीत्या मुंडे यांचा राजीनामा पवार यांनी घ्यावा असेही नमूद केले होते.
पवार यांनीही या घटनेची गंभीर नोंद घेत मी धनंजय मुंडे यांच्या जागी असतो तर राजीनामा दिला असता असेही जाहीरपणे नमूद केले होते. मात्र या सर्वांचा काहीच परिणाम होत नसल्यामुळे अखेर राजीनामा दिला नाही तर राज्यपालांकडे कारवाईची शिफारस करावी लागेल, असे मुंडे यांना सुनावले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात केवळ अजित पवारच नव्हे तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात घेतले होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातही न्यायालयाने स्थगिती नाकारल्यास अशीच कारवाई केली जाईल, हेही आता स्पष्ट झाले आहे.
या घटनाक्रमामुळे सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडत असल्याची भावना फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली होती. सरकारमध्ये शिस्त आणण्यासाठी मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडणे हे महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी काळात सर्व मंत्र्यांनी योग्य वर्तन ठेवावे, हा इशाराही फडणवीस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्यातून दिला आहे.हे.
छायाचित्रांमुळे संतापाची लाट
या प्रकरणात धागेदोरे केवळ वाल्मीक कराड याच्यापर्यंत पोहचत आहेत. माझे हात त्यात गोवलेले नाहीत. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे धनंजय मुंडे वारंवार स्पष्ट करत होते. त्यानंतर त्यांनी तब्येतीचे कारण पुढे करतही राजीनामा देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र बीड येथे दाखल केल्या गेलेल्या आरोपपत्रातील छायाचित्रे राज्यभरात संतापाची लाट निर्माण करत असल्याचे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणातून हात काढून घेत धनंजय मुंडे यांचे अप्रत्यक्ष संरक्षण मागे घेतले.