नागपूर - बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चित्रफीत पाहू शकत नाही. हा अमानुष खून आहे. आरोपींना जात नसते. ते कुठल्याही जातीचे असले तरी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मी संतोष देशमुख यांच्या आईची माफी मागते, असे म्हणत पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भावना मंगळवारी व्यक्त केल्या.
नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी आल्या असताना पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मला कल्पना नव्हती. आज सकाळी नागपूरला आल्यावर समाजमाध्यमांवरून ही माहिती मिळाली.
या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्यापासून माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. मी सर्वात आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती.’ मुंडे यांना मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती. तर पुढील प्रकार टळला असता.
शिवाय त्यांचा राजीनामादेखील अगोदरच घ्यायला हवा होता. देशमुख यांचे व्हिडिओ पाहण्याची माझ्यात हिंमत नाही. हा अमानवी प्रकार आहे. या प्रकारावर मी संतोष देशमुख यांच्या आईची माफी मागते,’ असे सांगताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले.
धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा दिला असता तर पदाची प्रतिष्ठा राहिली असती. मी त्याची लहान बहीण असून कुठल्याही कुटुंबासाठी ही दु:खद घटनाच आहे.
- पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री
कठोर शिक्षा व्हावी
आरोपींना कोणतीही जात नसते. आम्ही जेव्हा मंत्रिपद किंवा आमदारकीची शपथ घेतो तेव्हा जात-धर्म हा विषय आमच्यासाठी संपला असतो. कुणाविषयीही ममत्व भाव आम्हाला ठेवता येत नाही. त्यामुळे आरोपी कुठल्याही जातीचा असतो. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवे हीच माझी मागणी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.