मंगळवारी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने पराभूत केले आणि सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना गाठला.
यासोबतच ऑस्ट्रेलियासोबतचा जुना हिशोबही भारताने चुकता केला आहे. यापूर्वी अनेकदा आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया भारताच्या मार्गातील मोठा अडथळा ठरले आहेत. पण यावेळी भारताने उपांत्य सामन्यातच ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार केला आहे.
दुबईला झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने २६५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.
श्रेयस ४५ धावांवर बाद झाल्यानंतर विराटची चांगली साथ दिली. विराटने ८४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने २८ धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. शेवटी केएल राहुलने ४९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
केएल राहुलने षटकार ठोकताच भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष झाला. मैदानात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्येही विराटने रोहितजवळ जात त्याला कडाडून मिठी मारली. संपूर्ण भारतीय गोटात जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. या सेलिब्रेशनचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात सर्वबाद २६४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरेने अर्धशतके केली होती. स्मिथने ९६ चेंडूत ७३ धावा केल्या, तर कॅरेने ५७ चेंडूत ६१ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या.
आता बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. या सामन्यात विजेता होणारा संघ भारताविरुद्ध रविवारी (९ मार्च) अंतिम सामना खेळेल.