उमरगा : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष व निर्घृण हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासह विविध मागण्यांसाठी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (ता. पाच) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींनी माणुसकीला काळिमा फासत संतोष देशमुख यांचा अनन्वित छळ करीत त्यांची निर्घृण हत्या केली.
हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. ते या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत याचे पुरावे पोलिसांकडे आहेत; परंतु कारवाई केली जात नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
तसेच मुंडे यांचा सर्व कारभार वाल्मीक कराड हाच पाहतो. त्यामुळे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात नायब तहसीलदार रतन काजळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उमरगा तालुका सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.