Champions Trophy 2025 Final आधी आयसीसीची मोठी घोषणा, 5 जणांची नावं जाहीर
GH News March 07, 2025 12:10 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत धडक दिली. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर आता 9 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा थरार रंगणार आहे. हा महाअंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.  टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ या स्पर्धेतील अंतिम सामन्यात 2000 नंतर आमनेसामने असणार आहेत. न्यूझीलंडने 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टीम इंडियावर मात केली होती. त्यामुळे टीम इंडियाकडे 25 वर्षांनंतर या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. अशात या महाअंतिम सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.

आयसीसीकडून पंचांसह मॅच रेफरीच्या नावाची घोषणा

आयसीसीने या फायनलसाठी फिल्ड,थर्ड आणि फोर्थ अंपायर्ससह मॅच रेफरी अर्थात सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्यात पॉल रीफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे दोघे फिल्ड अंपायर असणार आहेत. जोएल विलसन थर्ड अंपायरची भूमिका बजावणार आहेत. कुमार धर्मसेना फोर्थ अंपायर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तर रंजन मदुगले हे सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरीच्या भूमिकेत असतील.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.