सावंतवाडी येथे १५ मार्चला
बालगीत सादरीकरण स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या ‘आपण व्यक्त होऊया’ समितीतर्फे तालुक्यातील बालवाडी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धा २०२५ चे आयोजन केले आहे. (कै.) प्रा. मिलिंद भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १५ मार्चला सायंकाळी ३ वाजता राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात होणार आहे.
प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ३० स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. स्पर्धेत २ ते ३ मिनिटांचे सादरीकरण अपेक्षित असून सहभागी होण्यासाठी १२ मार्चपर्यंत नाव नोंदणी करायची आहे. बालगीत सादरीकरण मराठी भाषेतून व पाठांतर स्वरुपात असावे. ही स्पर्धा निःशुल्क आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकास १ हजार, द्वितीय ७००, तृतीय ५००, उत्तेजनार्थ २०० रुपयांची दोन बक्षिसे तसेच प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. बक्षीस वितरण समारंभ याच दिवशी होईल.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष (कै.) प्रा. मिलिंद भोसले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार असून सचिव (कै.) सुभानराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक, शैक्षणिक सेवा सन्मान देऊन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे सचिव माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संचालक गौरव भोसले, विश्वस्त अनिल भोसले यांनी दिली. या स्पर्धेमध्ये पहिल्या ३० जणांना प्राधान्य असल्याने स्पर्धकांनी नाव नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन ''आपण व्यक्त होऊया'' समिती प्रमुख नीरज भोसले, कार्यक्रम संयोजक विनायक गांवस यांनी केले आहे.