रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी लढा उभारू
esakal March 07, 2025 02:45 AM

swt613.jpg
49534
सिंधुदुर्गनगरीः उपविभागीय परिवहन अधिकारी विजय काळे यांच्याशी चर्चा करताना नागेश ओरोसकर व इतर पदाधिकारी.

रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी लढा उभारू
नागेश ओरोसकरः सिंधुदुर्गनगरीत संघटनेच्या बैठकीत ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ः रिक्षाचालक मालक यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघ अविरत कार्यरत राहील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रिक्षा चालक-मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी केले.
ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिर येथे आज अध्यक्ष ओरोसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघाची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील रिक्षा चालक-मालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय परिवहन अधिकारी विजय काळे यांची भेट घेऊन रिक्षा व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. जुन्या रिक्षांना नवीन नंबर प्लेट बसवणे तसेच अन्य विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विजय काळे यांनी बुधवारी (ता. १२) जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे मान्य केले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. रिक्षा व्यवसायिक मृत झाल्यावर त्याचा परवाना वारस म्हणून त्याच्या पत्नीच्या नावे व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा रिक्षाचालक-मालक सेवा संघ आता रजिस्टर करण्यात आला असून यामार्फत आता जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी आपल्या प्रश्नांबाबत एकत्रित लढा देण्यासाठी रिक्षा चालक-मालक सेवा संघामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी अध्यक्ष ओरोसकर यांनी केले.
श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे आज झालेल्या बैठकीस महेश आंबडोसकर, विजय कांबळी, जयवंत टंगसाळी, रवींद्र माने, रविकांत चांदोसकर, धर्मेद्र सावंत, संतोष जंगले, मनोज वारे, सतीश सावंत आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.